संगमेश्वरमधील घटना
संगमेश्वर:- निवडणूक प्रक्रियेतील अत्यंत महत्त्वाचे मानले जाणारे केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) म्हणून नेमणूक असतानाही आपल्या कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात एका कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२४९-कसबा संगमेश्वर येथील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गजानन सखाराम सावंत यांनी निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उल्लंघन केल्याचे समोर आले आहे. तक्रारीनुसार, संबंधित अधिकारी चिपळूण विधानसभा मतदार संघाच्या आढावा बैठकीला, तसेच सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीलाही वारंवार अनुपस्थित राहिले.
संबंधित अधिकाऱ्याने निवडणूक आयोगाच्या सूचनांचे आणि निर्देशांचे पालन केले नाही./मतदार यादी भागाचे ऑफलाईन आणि ऑनलाईन काम अपूर्ण ठेवले असून त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाने कामात सुधारणा करण्यासाठी नोटीस बजावूनही त्यांनी त्याला कोणतेही उत्तर दिले नाही.
या प्रकरणी विस्तार अधिकारी (कृषी) पंचायत समिती देवरूख, प्रणय पांडुरंग भायनाक यांनी तक्रार दाखल केली आहे. संगमेश्वर पोलिसांनी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५० च्या कलम ३२ अन्वये हा गुन्हा नोंदवला असून अधिक तपास सुरू आहे.









