निधीअभावी जि. प. च्या पावणेसातशे शाळा दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

रत्नागिरी:- निधी अभावी जिल्हा परिषदेच्या सुमारे पावणेसातशेहून अधिक प्राथमिक शाळा दुरुस्तीच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हा नियोजनमधून 2020-21 या आर्थिक वर्षात शाळा दुरुस्ती आणि नवीन वर्ग खोल्यांसाठी 13 कोटी 73 लाख रुपयांचा निधी मिळेल अशी अपेक्षा आहे.

निसर्ग चक्रीवादळाने यंदा कोकण किनारपट्टीला चांगलेच झोडपून काढले. त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या इमारतींनाही बसला आहे. त्यामध्ये प्राथमिक शाळांची मोठी हानी झाली आहे. तत्पुर्वी दरवर्षी पावसाळ्यात शाळांची छपरे, भिंती यासह लाकुड साहित्यांची अदलाबदल अशी किरकोळ कामे करावी लागतात. अनेक वर्षे दुरुस्तीसाठी निधी न मिळाल्याने मोठी कामे निघालेली आहेत. जिल्ह्यात अडीच हजार प्राथमिक शाळा आहेत. त्यातील पन्नास टक्केहून अधिक शाळा जुन्या आहेत. शिक्षण विभागाकडून दरवर्षी शाळा दुरुस्ती आणि वर्गखोल्यांसाठी जिल्हा नियोजनकडे प्रस्ताव पाठविण्यात येतो. त्यानंतर निधीची तरतूद केली जाते. यंदा कोरोनामुळे 33 टक्केच निधी जिल्ह्याला मिळणार होता; मात्र शासनाने काही दिवसांपुर्वी नियोजनचा शंभर टक्के निधी देऊ असे आश्‍वासन दिले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळा दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पीय नियतवयातून 7 कोटी आणि दायित्वासाठी 1 कोटी 93 लाख रुपयांचा निधी मागितला आहे. यामधून सुमारे पावणेसातशे शाळांच्या दुरुस्तीची कामे होतील असा अंदाज आहे. त्याचबरोबर नवीन वर्गखोल्यांसाठी 6 कोटी 73 लाख अर्थसंकल्पीय नियतवयातून आणि 1 कोटी 60 लाख रुपये दायित्वचे मागण्यात आले आहेत. दोन्ही मिळून सुमारे 13 कोटी 73 लाख रुपयांचा निधी लागणार आहे. जिल्हा नियोजनमधून किती निधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ग्रामपंचायत निवडणुक झाल्यानंतर नियोजनची आढावा बैठक लागणार आहे. त्यामध्ये निधीची निश्‍चिती होणार आहे.

सर्व शिक्षा अभियानातून नवीन वर्ग खोल्यांसह शाळा दुरुस्तीसाठी यंदापासून निधी देण्यास सुरवात केली आहे. 45 शाळांना अडीच कोटी रुपये मिळाले आहेत. त्यामुळे जिल्हा नियोजनवरील निधीचा भार हलका होणार आहे. याचे जिल्हा परिषदेकडून स्वागत केले जात आहे. भविष्यात यामधून अधिकाधिक निधी मिळाल्यास दुरुस्तीचा प्रश्‍न कमी होणार आहे.