ना. सामंतांसह त्यांचे बंधू किरण सामंत यांना धमकी; पोलीस स्थानकात गुन्हा दाखल 

रत्नागिरी:- उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत व त्यांचे बंधू उद्योजक किरण सामंत यांची सोशल मीडियाद्वारे बदनामी करू, अशी फोनवरून धमकी देत जबरदस्तीने १० लाख रुपयांची मागणी करणाऱ्या संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. प्रदीप भालेकर जय हिंद न्यूज चॅनल, मुंबई (पूर्ण नाव-पत्ता माहित नाही) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना रविवारी घडली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार महेश मोहन सामंत (वय ४५, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) हे मंत्री उदय सामंत यांच्याकडे सामाजिक कामकाज व त्याचा पाठपुरावा करतात, तसेच उद्योजक किरण सामंत यांच्याकडेही ते स्वीय सहाय्यक म्हणून काम पहातात. उद्योजक सामंत यांच्या मोबाईलवर संशयित प्रदीप भालेकर याने फोन करुन त्यांच्याकडील बांधकाम व्यवसायामधील कामे मला द्या, अशी मागणी केली. तेव्हा किरण यांनी कामकाजाबाबत विचारणा केली असता मनात राग धरुन जयहिंद चॅनलवरुन खोट्या बातम्या करुन समाज माध्यमांद्वारे मंत्री सामंत व उद्योजक असलेल्या तुमची म्हणजे किरण सामंत यांची बदनामी करु, अशी धमकी दिली.

त्यानंतर संशयित प्रदीपने व्हॉट्सॲप कॉल करुन रविवारी (२६) महेश सामंत आणि मनिषकुमार मधुकर मोरे यांच्या मोबाईलवर मंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्याविरुद्ध घृणास्पद मजकूर पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली. खोटा व बदनामीकारक मजकूर छापून सामंत बंधूंची प्रतिमा बिघडवून टाकेन, अशी धमकीही त्याने दिली. या प्रकरणी महेश सामंत यांनी संशयिताविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पोलिस उपनिरीक्षक चव्हाण तपास करत आहेत.