नावेद- २ चे अवशेष काढण्यासाठी स्कुबा डायव्हिंगची घेणार मदत

नौकेची स्थिती पाहून निर्णय ; फतेहगड जहाजावरील कॅप्टनसह मेंबर्सवर गुन्हा दाखल

रत्नागिरी:- जयगड येथील बेपत्ता झालेल्या नावेद-२  नौकेचे अवशेष सापडल्यानंतर तिचा अपघात झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून जयगड पोलिसांनी कंपनीच्या ‘फतेहगड’ जहाजावरील कॅप्टन व अन्य क्रु मेंबर्स विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अपघातग्रस्त बुडालेली नौका काढण्यासंदर्भात प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याने नौका मालकाने खासगी स्कुबा डायव्हिंगशी संपर्क साधला आहे. त्याच्या माध्यमातून पाण्यातील नौकेची परिस्थिती पाहून ती ओढून काढण्याबाबत नियोजन केले जाणार आहे.

नासीर हुसेनमिया संसारे (वय ५२, रा. जयगड, अकबर मोहल्ला) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जयगड बंदरातून २६ ऑक्टोबरला २०२१ ला नावेद-२ ही नौका मच्छीमारीसाठी गेली होती. ३ दिवसात नौका परत येते. परंतु ही नौका परत न आल्याने या नौकेच्या शोध सुरू झाला. त्यानंतर पाच दिवसांनी दाभोळ परिसरात या नौकेवरील एका खलाशाचा मृतदेह आढळून आला. उर्वरित खलाशांचा शोध अजूनही सुरू आहे. या दरम्यान दोन दिवसांपूर्वी एका मच्छीमारी नौकेला बुडालेल्या नावेद-२ जहाजाचे अवशेष सापडले. नासीर संसारे यांनी याबाबत जयगड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. २६ ऑक्टोबरच्या मध्यरात्री नावेद-२ या नौकेला एका  कंपनीच्या फतेहगड या जहाजावरील कॅप्टन व जहाज चालविण्याची जबाबदारी असणारे अन्य क्रु. मेंबर्स यांनी जयगड बंदरातून २६ ला रात्री १२.०२ वाजण्याच्या सुमारास समुद्रातुन जाताना नावेद-२ या नौकेला धडक दिली. यामध्ये नौकेवरील खलाशी, तांडेल यांच्या लहान, मोठ्या दुखापती व मृत्युस, तसेच नावेद-२ बोटीच्या नुकसानाला कारणीभूत ठरल्याप्रकरणी जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता हा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सदाशिव वाघमारे यांच्याकडे वर्ग करण्यात आला आहे.  नावेद २ चे अवशेष मिळाल्यामुळे या प्रकरणाला गती मिळाली आहे. अपेक्षित गतीने शासकीय यंत्रणेकडून नौकेचा तापास होत नाही. त्यामुळे नौका मालक श्री. संगारे यांनी बुडालेली नौका काढण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. ज्या भागात हे अवशेष मिळाले, त्या भागामध्ये खासगी स्कुबा डायव्हिंगची मदत घेतली जाणार आहे. त्यांना पाण्यात उतरवून बुडालेल्या नावेदची नेमकी स्थिती काय, ओढून काढणे  शक्य आहे का, याचा निर्णय घेतला जाणार आहे.