रत्नागिरी:- शहरातील एकता मार्ग येथील नाना-नानी पार्क गार्डनकडे जाणार्या रस्त्यावर टपरीच्या आडोशाला जुगार चालवणार्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सोमवार 22 एप्रिल रोजी रात्री 8 वा. करण्यात आली. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम असा 1 हजार 395 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दिलीप वसंत धनावडे (54, रा.हिंदू कॉलनी, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस हेड काँस्टेबल अरुण चाळके यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, सोमवारी रात्री संशयित हा एकता मार्ग येथील एका टपरीच्या आडोशाला मधुर मटका जुगार खेळ चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. संशयिताविरोधात महाराष्ट्र जुगार अधिनियम 1887 चे कलम 12 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.