नाताळ, नववर्षाच्या पार्श्भूमीवर जिल्ह्यात मनाई आदेश जारी

रत्नागिरी:- जिल्ह्यात नाताळ व नववर्ष स्वागत उत्सव साजरे होत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून मनाई आदेश जारी करण्यात आला आहे.

राजापूर तालुक्यातील बारसू सोलगाव, वरचीवाडी गौवळ, खालचीवाडी गोवळ व आजूबाजूच्या परिसरात रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. या प्रकल्पास तेथील काही गावच्या स्थानिकांचा विरोध असून त्या अनुषंगाने मागील सहा महिन्यांपासून वेगवेगळ्या स्वरुपात आंदोलने करून विरोध दर्शविण्यात येत असून, तेथे कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. प्रस्तावित ठिकाणी ड्रोन व भू – सर्वेक्षणादरम्यान आंदोलनात्मक कार्यक्रमाचे वेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला होता. त्यामुळे भू -सर्वेक्षण सुरू झाल्यास ग्रामस्थांकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, विविध संघटना तसेच वेगवेगळ्या घटकांतील नागरिकांकडून त्यांचे विविध मागण्यांकरिता आंदोलनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते. अशावेळी आंदोलनकर्त्याच्या मागण्या मान्य न झाल्यास कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोणत्याही प्रसंगी क्षुल्लक कारणावरून झालेल्या घटनांचे पडसाद उमटून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी, याकरिता जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये मनाई आदेश जारी करण्यात येत आहे. अपर जिल्हादंडाधिकारी रत्नागिरी यांनी पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) सन १९५१ चा कायदा २२ वा नुसार २५ डिसेंबर २०२२ रोजी चे ००.०१ वा. पासून ते ०८ जानेवारी २०२३ रोजी २४.०० वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्यात मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केला आहे या आदेशान्वये वरील कालावधीत खालील कृत्य करण्यास मनाई करणेत येत आहे.

शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरता येतील अशी हत्यारे, सोटे, तलवारी, बंदुका, सुरे, लाठ्या अगर कोणतीही वस्तू घेऊन फिरणे, अंग भाजून टाकणारा कोणताही दाहक किंवा स्फोटक पदार्थ घेऊन फिरणे, दगड किंवा इतर शस्त्रे, हत्यारे किंवा शस्त्रे फेकावयाची साधने बरोबर घेऊन फिरणे, गोळा करणे किंवा तयार करणे, सभ्यता अगर निती याविरुध्द अशी किंवा शांतता धोक्यात येईल अशी भाषणे करणे, अगर सोंग आणणे, अगर कोणतीही वस्तू किंवा जिन्नस तयार करणे व लोकांत प्रसार करणे. इसम अगर प्रेते किंवा आकृती यांच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणे, सार्वजनिक’ रितीने घोषणा करणे, गाणी गाणे, वाद्य वाजविणे, पाच किंवा पाचपेक्षा जास्त इसमांनी विनापरवानगी एकत्र येणे या कृत्यांना मनाई करण्यात आली आहे.

सदरचे आदेश अंत्ययात्रा, धार्मिक विधी, धार्मिक मिरवणूक, लग्नसोहळा, सामाजिक सण, शासकीय कार्यक्रम, शासकीय सेवेत तैनात कर्मचारी, सार्वजनिक करमणुकीची सिनेमागृह, रंगमंच या बाबींना लागू होणार नाही, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

प्रतिबंधात्मक आदेशाच्या काळात कोणताही मोर्चा, मिरवणूका तसेच सभा निवडणूक प्रचार सभेचे आयोजन करावयाचे झाल्यास संबंधित उपविभागीय दंडाधिकारी यांची लेखी परवानगी घेणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.