खानू मठ येथे कारमधून खाली पडल्याने घडली दुर्दैवी घटना
रत्नागिरी:- तालुक्यातील नाणिज येथील एका ३० वर्षीय तरुणाचा अपघाती मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खानू मठ परिसरात कारमधून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. संकेत सुनील संसारे (वय ३०, रा. नाणिज, तळवाडी बाजारपेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवार ६ एप्रिल रोजी संकेत संसारे हा आपल्या कारने खानू मठ परिसरात गेला होता. यादरम्यान कारमधून खाली पडल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेची माहिती मिळताच संकेतचे चुलते अनिल विठोबा संसारे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी संकेतला तातडीने उपचारासाठी पाली येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
पाली येथील प्राथमिक तपासणीनंतर, संकेतची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला अधिक उपचारासाठी रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला रत्नागिरी येथे दाखल करण्यात आले, मात्र ७ एप्रिल रोजी पहाटे १:१५ च्या सुमारास डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. बी.एन.एस.एस. कलम १९४ (आमृ. क्रमांक २६/२०२६) नुसार या घटनेचा तपास सुरू आहे. नाणिज सारख्या ग्रामीण भागातील एका तरुण उद्योजकाचा/तरुणाचा अशा प्रकारे अपघाती मृत्यू झाल्याने संपूर्ण बाजारपेठ परिसरात आणि नाणिज गावावर शोककळा पसरली आहे.









