Sunday, June 21, 2026
spot_img
Home गुन्हेगारी नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक

नाणार येथील घरफोडी प्रकरणातील आरोपीला अटक

राजापूर:- नाटे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नाणार पाळेकरवाडी येथे झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास यशस्वीपणे पूर्ण करत नाटे पोलिसांनी चोरीस गेलेला संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केला आहे. या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली असून, त्याला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली आहे.

या घटनेची अधिक माहिती अशी की, दिनांक ११ मे ते ९ ऑक्टोबर या कालावधीत नाणार पाळेकरवाडी येथील रहिवासी सुरेश मरतू प्रभू यांच्या बंद घरात अज्ञात चोरट्याने प्रवेश करून चोरी केली होती. यावेळी चोरट्याने एलजी कंपनीचा काळ्या रंगाचा स्मार्ट टीव्ही, टाटा कंपनीचा सेट-अप बॉक्स आणि एक लाल रंगाची एच.पी. गॅस कंपनीची सिलेंडर टाकी असा एकूण ₹१०,०००/- किमतीचा मुद्देमाल लंपास केला होता.

या घरफोडीच्या घटनेनंतर, दिनांक १२ ऑक्टोबर २०२५ रोजी नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ७६/२०२५, भारतीय न्याय संहिता कलम ३०५, ३२४(४) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन, रत्नागिरी जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली नाटे पोलीस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या गुन्ह्याचा तपास अत्यंत वेगाने सुरू केला.

तपासादरम्यान, नाटे पोलिसांनी दिनांक २७ नोव्हेंबर रोजी या गुन्ह्यातील संशयित आरोपी विजय मधुकर गुरव (वय २९, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी, जि. कोल्हापूर) याचा कोल्हापूर कळंबा कारागृह येथून ताबा घेतला. नाटे पोलीस ठाण्यात आरोपीकडे कसून चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपी विजय गुरव याने वरील चोरीचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे, आरोपीने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने कारवाई करत मेमोरेंडम पंचनाम्याच्या वेळी चोरलेला सर्वच्या सर्व मुद्देमाल हस्तगत करण्यात यश मिळवले. यामुळे चोरीस गेलेला संपूर्ण ₹१०,०००/- किमतीचा मुद्देमाल नाटे पोलीस ठाण्यामार्फत तक्रारदाराला परत मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
आरोपी विजय मधुकर गुरव यास माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला दिनांक ०१ डिसेंबर २०२५ पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. नाटे पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत.

पोलीस अधीक्षक श्री. नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. बी.बी. महामुनी यांच्या अचूक मार्गदर्शनाखाली, प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक श्री. प्रमोद वाघ यांनी आणि त्यांच्या पथकातील स.पो.उ.नि. श्री. झगडे, स.प.फौ/२९ चव्हाण, पो.कॉ/४१० पाटील, आणि पो.कॉ/३३४ कुसळे यांनी ही यशस्वी कारवाई केली आहे.