नाणार जमीन खरेदी व्यवहार घोटाळ्यातील गुंतवणूकदारांशी भाजप नेतेमंडळींचा संबंध

अशोक वालम यांचा थेट आरोप

रत्नागिरी:- नाणार रिफायनरी हा विषय आता पुन्हा येणार नाही. मात्र त्यासाठी भाजपवाल्यांची वायफळ बडबड सुरू आहे. नाणार येथील जमीन खरेदी व्यवहार घोटाळ्यात गुंतवणूकदार हे गुजराती, मारवाडी असून त्यांच्याशी कोकणातील भाजपाच्या काही नेतेमंडळींचे लागेबंधे आहेत. त्यामुळे भीतीपोटी नाणारचे समर्थन सुरू आहे. पण या मंडळींचे घोटाळे बाहेर काढण्यासाठी काही दिवसांत मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे नाणार रिफायनरी विरोधी संघर्ष समितीचे नेते अशोक वालम यांनी सांगितले. 

भाजपाचे राज्य सचिव तथा सिंधुदूर्गचे जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी रत्नागिरीत रविवारी नाणार रिफायनरी होणार, विषय संपणार नसल्याची वक्तव्ये केली. याबाबत अशोक वालम यांनी सोमवारी रत्नागिरीत जठार यांच्यावर जोरदार टिका केली. जठार यांची नाहक वायफळ बडबड सुरू असून त्यात काही तथ्य नाही. त्यांना महाविकास आघाडीचे सरकार जाणार आणि पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनवणार अशी स्वप्ने पडू लागली आहेत. त्यामुळे नाणार रिफायनरी आणणार असल्याचे सांगत आहेत. 

नाणारची जनता या प्रकल्प हटविण्यासाठी कशाप्रकारे लढलीय हे जठार यांनाही अवगत असेल. रिफायनरी रद्द झाला आणि तेथील जनतेला द्विगुणीत  शक्ती निर्माण झालीय, मनोबल वाढलेय. त्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यानंतर लोकांनी त्याही पुढे पाऊल टाकलेय. आता तेथील जमिनींच्या व्यवहाराचे घोटाळे बाहेर निघावेत म्हणून शासनाकडे मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे भाजपाचे धाबे दणाणले आहेत. कारण घोटाळे बाहेर पडणार असल्याचे वालम यांनी सांगितले. पण आम्हाला माहित आहे की, रिफायनरी पुन्हा येणार नाही, म्हणून आम्ही शांत आहोत. मात्र भाजपाचे घोटाळे नक्की बाहेर काढू. त्यासाठी नाणार येथील 2016 ते 2019 पर्यंतचे जमीनींचे व्यवहार रद्द झाले पाहिजेत. त्याची उच्चस्तरीय चौकशी शासनाने लावावी अशी मागणी आहे. वेळ पडल्यास त्यासाठी मोठे आंदोलन करण्याचा इशारा अशोक वालम यांनी दिला आहे.