नाचणे येथे ब्राऊन हेरॉईनसह एकाला घेतले ताब्यात

एलसीबीची सलग तिसऱ्या दिवशी मोठी कारवाई

रत्नागिरी:- रत्नागिरी शहरात गांजा, टर्की आणि ब्राऊन शुगरसारख्या अंमली पदार्थांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. सोमवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने केलेल्या कारवाईत तब्बल दोन लाख पाच हजार रुपयांचा ब्राऊन हेरॉईन सदृश्य अंमली पदार्थ जप्त करण्यात आला. विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांतील एलसीबीची ही तिसरी मोठी कारवाई आहे, ज्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

जिल्हा पोलीस यंत्रणेने अंमली पदार्थांच्या विरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. सोमवारी एलसीबीचे पोलीस पथक रत्नागिरी शहरात गस्त घालत असताना नाचणे ते गुरुमळी मार्गावर एका दुचाकीस्वाराच्या संशयास्पद हालचाली पोलिसांना दिसून आल्या. त्याच्याजवळ असलेल्या पिशवीत अंमली पदार्थ असण्याची शक्यता वाटल्याने पोलिसांनी दोन पंचांना बोलावून त्याची तपासणी केली.

या तपासणीत त्याच्या ताब्यातील पिशवीत ब्राऊन हेरॉईन सदृश्य १५४ पुड्या आढळून आल्या. या पदार्थांचे वजन १० ग्रॅम असून त्याची किंमत दोन लाख पाच हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी तात्काळ आरोपी अदनान नाजीममियाँ नाखवा (वय २५, रा. जुना फणसोफ, ता. जि. रत्नागिरी) याला ताब्यात घेतले आणि त्याच्याकडून मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी आरोपी आणि जप्त केलेला माल रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला आहे.

जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आणि अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाई पथकात एपीआय वाघ, पोहेकॉ झोरे (क्रमांक २५१), पोहेकॉ पालकर (क्रमांक ३०१), पोहेकॉ सावंत (क्रमांक ३०६) आणि पोहेकॉ डोमणे (क्रमांक ४७७) यांचा समावेश होता.

सलग तिसऱ्या दिवशी एलसीबीने केलेली ही मोठी कारवाई शहरात अंमली पदार्थांचे जाळे किती खोलवर पसरले आहे, हे दर्शवते. पोलिसांनी या दिशेने अधिक कठोर पाऊले उचलण्याची गरज नागरिकांकडून व्यक्त होत आहे.