नाचणे येथे बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत प्रवेश; एकाला अटक

रत्नागिरी:- शहरातील नाचणे भागात बँकेने जप्त केलेल्या मालमत्तेत बेकायदेशीरपणे घुसून ताबा मिळवण्याचा प्रयत्न एका व्यक्तीने केला. मालमत्तेच्या मालकाने विरोध केला असता, आरोपीने त्याचे म्हणणे जुमानले नाही. याप्रकरणी शहर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

अख्तर फकीर महंमद काझी (वय ५९, रा. पावस) यांनी यासंदर्भात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादीनुसार, नाचणे येथील सर्व्हे नं. ३९०, हिस्सा नं. १/३/४/डी/१३ आणि सीटी सर्व्हे नं. ७१७ ए/१३ मधील मालमत्ता (घर नं. ७५० क्यु, मालमत्ता क्र. Z2W2005281) बँकेने दि. २२ एप्रिल २०२५ रोजी जप्त केली होती.

आरोपी दानिश जमिर पटेल (वय ३९, रा. राजनगर, चर्मालय, मजगांव रोड) याने २२ एप्रिल ते २३ एप्रिल २०२५ दरम्यान बँकेच्या ताब्यात असलेल्या या मालमत्तेत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. त्याने मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करत नुकसान केले. फिर्यादी अख्तर काझी यांनी त्याला विरोध केला, परंतु आरोपीने त्यांचे ऐकले नाही.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दानिश पटेल याने जिल्हाधिकारी आणि मंडल अधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन करून मालमत्तेत बेकायदेशीरपणे प्रवेश करत ताबा मिळवला. तसेच, बँकेकडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न करता फसवणूक केली, असेही फिर्यादीत नमूद आहे.

लांजा पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपी दानिश पटेल याला भारतीय न्याय संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१६(२), २२३, ३२९(४), ३२४(४) आणि ३१८(२) अन्वये अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.