Saturday, May 16, 2026
spot_img
Home रत्नागिरी नाखरे येथे कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून भाजलेल्या तरुणीचा मृत्यू

नाखरे येथे कुकरमधील गरम डाळ अंगावर उडून भाजलेल्या तरुणीचा मृत्यू

रत्नागिरी:- कुकरमधील गरम डाळ अंगावर उडाल्याने भाजलेल्या एका २३ वर्षीय तरुणीचा उपचारापूर्वीच दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रत्नागिरीत घडली आहे. लक्ष्मी हल्लेपा बुदीहल (रा. नाखरे, मूळ रा. कर्नाटक) असे मृत तरुणीचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी ही रत्नागिरी तालुक्यातील बोरभाटले-नाखरे येथे वास्तव्यास होती. घरी चुलीवर कुकरमध्ये डाळ शिजल्यानंतर, कुकर खाली उतरवत असताना तिला अचानक चक्कर आली. यावेळी तिच्या हातातील कुकर खाली पडला आणि त्यातील गरम डाळ तिच्या तोंडावर, हनुवटीवर आणि दोन्ही हातांच्या मनगटावर उडाली. यात ती गंभीररीत्या भाजली होती.

​घटनेनंतर सुरुवातीला तिच्या वडिलांनी, हल्लेपा सिद्रमाप्पा बुदीहल यांनी तिच्यावर घरीच प्राथमिक उपचार केले होते. मात्र, बुधवार दिनांक १३ मे रोजी सकाळी १०:३० च्या सुमारास लक्ष्मीच्या जखमा अधिक दुखू लागल्या आणि तिची प्रकृती बिघडून ती बेशुद्ध पडली.

​तिला तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्र, सापुचेतळे (ता. लांजा) येथे दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी प्रथमोपचार करून तिला अधिक उपचारांसाठी १०८ रुग्णवाहिकेने जिल्हा शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे पाठवले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच दुपारी ०२:२५ वाजता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

​या घटनेची नोंद रत्नागिरी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये आकस्मिक मृत्यूची नोंद (आमृ. क्रमांक १७/२०२६) करण्यात आली असून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.