नवीन वर्ष सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदी; वर्षात 24 सार्वजनिक सुुट्ट्या

रत्नागिरी:- पुढील वर्षी म्हणजे 2024 मध्ये किती आणि कधी सार्वजनिक सुट्ट्या मिळणार याची उत्सुकता सरकारी कर्मचारी, अधिकारी, शिक्षक, प्राध्यापक, विद्यार्थी, बँक कर्मचारी, खासगी कंपन्यांमधील कर्मचारी अशा सर्वांनाच लागलेली असते. राज्य सरकारने 2024 या नवीन वर्षासाठी 24 सार्वजनिक सुुट्ट्या जाहीर केल्या आहेत. गणेश चतुर्थी 7 सप्टेंबर तर दिवाळी एक व दोन नोव्हेंबरला येणार आहे.

राज्य सरकारने जाहीर केलेल्या सुट्ट्यांनुसार 8 वेळा सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय कर्मचारी-अधिकारी आणि शनिवार-रविवार सुट्ट्या असणार्‍या खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना होणार आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या 2024 च्या सार्वजनिक सुट्ट्यांच्या यादीनुसार पुढील वर्षीच्या सरकारी कर्मचार्‍यांना 24 सार्वजनिक सुट्ट्या मिळणार आहेत. यात स्थानिक सुट्ट्यांचा समावेश नाही. पुढील वर्षीच्या दोन सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी रविवार तर तीन सुट्ट्यांच्या दिवशी शनिवार आहे. आणखी दोन दिवसांच्या रजा टाकून बाहेरगावी फिरायला जाण्याचे बेत आखणार्‍यांसाठी पुढील वर्षी मोठ्या प्रमाणावर संधी आहे.

सलग तीन दिवस सुट्ट्यांचा 8 वेळा लाभ
26 जानेवारी शुक्रवारी येत असल्याने आणि शनिवार व रविवार शासकीय सुट्टी वा काही कंपन्यांमध्ये कार्पोरेट सुट्टी असल्याने सरकारी कर्मचारी, अधिकारी वा खासगी कंपन्यांमधील कर्मचार्‍यांना सलग तीन दिवस सुट्ट्या मिळू शकतात. 19 फेब्रुवारी सोमवारी शिवजयंतीची सुट्टी आहे. 17 आणि 18 फेब्रुवारी रोजी शनिवार-रविवार येत असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांची संधी शासकीय कर्मचार्‍यांना लाभणार आहे. 8 मार्च शुक्रवारी महाशिवरात्रीची सुट्टी असून 9 व 10 रोजी शनिवार व रविवारच्या सुट्ट्या असल्याने सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ शासकीय अधिकारी-कर्मचारी वर्गाला घेता येणार आहे.
याशिवाय 25 मार्च रोजी सोमवारी होळीच्या दुसर्‍या दिवसाची सुट्टी असल्याने 23 मार्च शनिवार व 24 मार्च रविवार अशा जोडून तीन दिवसांच्या सुट्टीचा लाभ घेता येणार आहे. 29 मार्च शुक्रवार रोजी गुड फ्रायडेनिमित्त सुट्टी असून 30 व 31 मार्च अनुक्रमे शनिवार-रविवार अशा सुट्ट्या येत असल्याने सलग तीन दिवस मिळणार आहेत. बकरी ईदनिमित्त 17 जून रोजी सोमवारी सुट्टी येत असल्याने 15 ते 17 अशा सलग तीन दिवस सुट्ट्या मिळणार आहेत. ईद-ए-मिलाद निमित्त सोमवार, दि. 16 सप्टेंबर रोजी सुट्टी असल्याने 14 ते 16 सप्टेंबर असा सलग तीन दिवस सुट्ट्यांचा लाभ नोकरदारांना मिळणार आहे. गुरुनानक जयंती 15 नोव्हेंबर शुक्रवारी असल्याने 15 ते 17 नोव्हेंबर अशा सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत.