रत्नागिरी:- स्वच्छ व सुंदर किनारे, निसर्गरम्य ठिकाणांसह कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याने मुंबई, पुण्यासह विविध मोठ्या शहरातील बहूतांश पर्यटक नववर्ष स्वागतोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात लाखो पर्यटक दाखल झाले आहेत. त्यामुळे सरत्या वर्षाच्या शेवटच्या दिवशी पर्यटन व्यवसाय तेजीत आला आहे. पर्यटन विकास महामंडाळाची निवास व्यवस्था 3 जानेवारीपर्यंत फुल्ल असून हॉटेल व्यावसायिकही समाधानी दिसत आहेत.
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी अनेक जणांकडून नियोजन केले जाते. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी फिरायला जाण्यासह पार्ट्या आयोजित केल्या जातात. त्यात किनारी भागांना सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. यंदा कोरोनाचे सावट या उत्सावावर राहणार आहे. गेल्या आठ दिवसात लाखो पर्यटकांनी दापोली, गुहागर, गणपतीपुळे येथील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी हजेरी लावली होती. 24 ते 26 डिसेंबरला सर्वाधिक गर्दीची नोंद झाली. त्यानंतर हळूहळू जोर ओसरला; परंतु 31 डिसेंबरला त्यात वाढ होण्याची शक्यता आहे. गणपतीपुळे हे धार्मिक पर्यटन स्थळ असून येथे किनारा आहे. त्यामुळे देवदर्शनासह निसर्गाचा आनंदही घेता येतो. महानगरपालिकांमध्ये इंग्लंडमधून आलेल्या कोरोनाच्या नवीन स्वरुपाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहेत. शासनाकडून रात्री 11 पर्यंत बाहेर फिरण्याची मुभा दिली आहे. त्यामुळे नववर्ष स्वागताचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक मध्यमवर्गीय पर्यटक कोकणात दाखल होत आहे. कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. एमटीडीसीच्या वेळणेश्वर, तारकर्ली आणि गणपतीपुळेतील निवास स्थाने 3 जानेवारीपर्यंत फुल्ल आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावरही प्रचंड गर्दी असून गोव्यात गर्दी झाल्यामुळे पर्यटकांनी आपली पावले सिंधुदूर्ग, रत्नागिरी जिल्ह्यांकडे वळवली आहेत. पर्यटकांचा राबता वाढला तर त्याचा फायदा पर्यटन व्यावसायिकांना होणार आहे. 31 डिसेंबरच्या रात्री गडबड गोंधळ होऊ नये यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी करण्यात येणार आहे. प्रशासनाकडून तशा सुचना देण्यात आल्या आहेत. अनुचित प्रकारासह, गर्दी टाळण्याचे आवाहन शासनाकडून करण्यात आले आहे. किनारी भागात पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. गर्दी होण्याची शक्यता असलेल्या जागा लक्षात घेऊन तिथे बॅरिगेटस् लावण्यात आली आहेत.









