दापोली:- नवऱ्याच्या प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून दापोलीतील कुडावळे गावातील विवाहितेचा पती, सासू व सासरे यांच्याकडून शारीरिक व मानसिक छळ तसेच दमदाटी व मारहाण केल्याने पीडित महिलेने दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. यावरून संशयित तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी अर्चना राम पवार (वय 28) राहणार कुडावळे आदिवासीवाडी यांचा विवाह राम शिवाजी पवार यांच्या सोबत झाला होता. यादरम्यान राम पवार यांचे एका मुलीबरोबर प्रेम संबंध जुळले होते. यावर फिर्यादी अर्चना पवार यांनी आक्षेप घेत घेतला होता. त्यामुळे सप्टेंबर महिन्यापासून ते दिनांक 27 जानेवारी 2022 पर्यंत संशयित आरोपी पती राम शिवाजी पवार (वय 24 ), सासरे शिवाजी राजू पवार (वय 55), सासू उषा शिवाजी पवार (वय 53) सर्व राहणार कुडावळे आदिवासीवाडी यांनी पीडितेला दमदाटी करत मारहाण केली. शारीरिक व मानसिक छळ केला, असे फिर्यादीत म्हणण्यात आले आहे. तसेच पती राजू पवार याने फिर्यादी अर्चना पवार यांना कोणतीही माहिती न सांगता सांगडे, तालुका खानापूर, जिल्हा रायगड येथील एका मुलीसोबत परस्पर विवाह केल्याने फिर्यादी अर्चना पवार यांनी दापोली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या घटनेचा अधिक तपास महिला हेडकॉन्स्टेबल सुकाळे या करीत आहेत.