नरबे गोवळकरवाडी येथे शेजाऱ्यावर सुरीने वार; एकावर गुन्हा

रत्नागिरी:-  तालुक्यातील नरबे गोवळकरवाडी येथे गुरुवारी (दि. १ मे २०२५) सकाळी सव्वा आठ ते साडे आठच्या दरम्यान शेजारी राहणाऱ्या दोघांमध्ये हाणामारीची घटना घडली. या हल्ल्यात नारायण धर्मा धनावडे (वय ५५) गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुरुनाथ नारायण शितप (रा. नरबे गोवळकरवाडी) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी नारायण धनावडे आणि आरोपी गुरुनाथ शितप हे एकाच गावात शेजारी-शेजारी राहतात. आरोपी गुरुनाथ शितप याने फिर्यादी धनावडे यांच्याबद्दल गैरसमज करून घेतला होता. याच रागातून गुरुवारी सकाळी त्याने आणलेल्या धारदार सुरीने नारायण धनावडे यांच्या डाव्या कुशीत बरगडीखाली वार केले. तसेच, त्यांच्या हातावर, बोटांवर आणि उजव्या पायावरही सपासप वार केले. इतकेच नव्हे, तर दगडाने त्यांच्या कपाळावर मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले नारायण धनावडे यांच्यावर तातडीने उपचार सुरू केले आहेत. पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, आरोपी गुरुनाथ शितप याच्या अटकेसाठी पुढील कार्यवाही करत आहेत.