नऊ वर्षे वॉन्टेड आरोपीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या

रत्नागिरी:- गंभीर गुन्ह्यात तब्बल 9 वर्षे वॉन्टेड असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. या आरोपीला मुंबई येथून बेड्या ठोकण्यात आल्या असून त्याला सावर्डे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

किरण प्रभाकर कारेकर (57, असूर्दे, चिपळूण) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्या विरोधात सावर्डे पोलीस ठाणे येथे भा.द.वि.सं कलम 498 (अ), 494, 495, 323, 504 व 506 अन्वये, दिनांक: 20 जानेवारी 2014 रोजी गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्यामधील आरोपी किरण प्रभाकर कारेकर हा गुन्हा दाखल झाल्यापासून नजरेआड झाला होता. त्याचा, सर्वोतोपरी शोध घेऊनही, तो मागील 9 वर्षापासून मिळून येत नव्हता. या आरोपीच्या शोधाकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. धनंजय कुलकर्णी, व मा. अपर पोलीस अधीक्षक, श्रीमती. जयश्री गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक तयार करण्यात आले होते.

सदर पथकाने, या पाहिजे असलेल्या (वॉन्टेड) आरोपीच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहीती प्राप्त केली असता आरोपी किरण प्रभाकर कारेकर याला सर्वोदय नगर, गोरेगांव (पूर्व) मुंबई येथून ताब्यात घेण्यात आले. पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी, सावर्डे पोलीस ठाण्याकडे सोपविण्यात आले आहे. ही कामगिरी सपोफौ प्रशांत बोरकर, पोहेकॉ विजय आंबेकर पोहेकॉ योगेश नार्वेकर, दत्ता कांबळे यांनी केली.