धनजीनाका येथे भैरीच्या पालखी मिरवणुकीत अपंग तरुणाला मारहाण

रत्नागिरी:- रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री भैरी देवाच्या पालखी मिरवणुकीला काही तरुणांनी गालबोट लावले. धनजीनाका येथे एका अपंग तरुणाला मारहाण करण्यात आली. रायशू सचिन वायंगणकर असे या तरुणाचे नाव आहे.

अपंग तरुणाला सोडवण्यासाठी आलेल्या वडिलांनाही मारण्यात आले. त्याचबरोबर धनजी नाका येथील काही तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये अपंग मुलाच्या वडिलांच्या करंगळीचे हाड फॅक्चर झाले आहे. त्याचबरोबर एका तरुणाच्या डोक्याला दुखापत होऊन दोन टाके पडले आहेत.

श्री भैरी देवाची पालखी शनिवारी संध्याकाळी धनजीनाका येथे आली असता अपंग तरुण रायशू वायंगणकर आपल्या सहकाऱ्याच्या खांद्यावरून मोबाईलमध्ये चित्रीकरण करत होता. या तरुणाला पायावर उभेही राहता येत नसल्याने तो सहकाऱ्याच्या खांद्यावरून चित्रीकरण करत असताना मांडवीतील तरुण कॅमेऱ्यासमोर आला. त्यावेळी रायशूने त्या तरुणाला बाजूला होण्यास सांगितले. या रागातून रायशूला खांद्यावरून खाडी ओढून पाडल्यानंतर मारहाण करण्यात आली. हा प्रकार शेजारीच मिरवणूक पाहत उभ्या असलेल्या वडील सचिन वायंगणकर यांना कळल्यानंतर ते मुलाला सोडवण्यासाठी आले असता त्यानाही बेदम मारण्यात आली.

धनजीनाका येथे ही हाणामारी सुरू असल्याची माहिती मिळताच धनजीनाका येथेच राहणारे काही तरुण तेथे आले आणि मारामारी सोडवू लागले. त्यावेळी एका तरुणाने अलमनामक तरुणाच्या डोक्यावर फाईट मारली. यामध्ये अलमच्या डोक्यावर दोन टाके पडले असून, सचिन वायंगणकर यांच्या हाताची करंगळी फॅक्चर झाली आहे.

ही हाणामारी सुरू असताना आरडाओरड होत असल्याचे पाहून एका पोलिसाने घटनास्थळी धाव घेतली. त्या पोलिसांनाही तरुणाने उद्धटगिरी करून अंगावर धावून जाण्याचा पराक्रम केला. परंतु पोलिसाने त्या तरुणाला पकडून शहर पोलिस ठाण्यात नेले. मांडवीतील त्या तरुणाने इतरही दोन तरुणांना मारहाण केली. या संदर्भात सचिन वायंगणकर यांनी शहर पोलिसांकडे तक्रार केली आहे.