भाट्येतील भाटकर कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला
रत्नागिरी:- जिल्ह्यात कोरोनाने होत्याचे नव्हते केल्याच्या अनेक घटना घडल्या. तरुण, कुटुंब प्रमुख, उद्योजक, वकील सगळेचजण या कोरोनाच्या फेऱ्यात सापडले आणि अनेकांनी आपली जवळची माणसं गमावली. हाच प्रत्यय भाट्ये येथे राहणाऱ्या भाटकर कुटूंबाला आला. शहरानजीकच्या भाट्ये परिसरात राहणार्या दोन सख्ख्या भावांचा एकाचदिवशी मृत्यू झाला आणि बापासाठी १२ वर्षीय मुलाने फोडलेला हंबरडा पाहून अनेकांचे काळीज हेलावले.
गुरूवारी पुन्हा एकदा हृदयद्रावक घटना शहरानजीकच्या भाट्ये परिसरात घडली आहे. दोन सख्खे भाऊ एकाचवेळी कोरोनाबाधित झाले. त्यातील एका भावाची पत्नी व आईदेखील कोरोनाबाधित झाली. या सर्वांना रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र पुन्हा एकदा कोरोनारूपी काळाची दिनेश गोकुळ ऊर्फ बंड्या भाटकर व त्यांचे बंधू राजन भाटकर या दोन सख्ख्या भावांवर वक्रदृष्टी पडली आणि दोन्ही भावांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
एकाचवेळी दोन भाऊ कोरोनाने मृत्यू पावल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली. मात्र १२ वर्षीय मुलाने आपल्या बापासाठी फोडलेला हंबरडा हा अनेकांचे काळीज पिळवटून टाकणारा होता. माणूस आज आहे, उद्या नाही या वाक्याची प्रचिती कोरोनाच्या काळात येऊ लागली आहे. दरम्यान, यातील रूग्णालयात दाखल असलेल्या आईची व पत्नीचीदेखील प्रकृती खालावली असल्याची माहिती पुढे आली आहे.









