दोन भीषण अपघातात एकाचा मृत्यू, महिला डॉक्टर गंभीर जखमी

मंडणगड तालुक्यातील घटना

मंडणगड:- खेड-पुरार राज्यमार्गावर पालघर ते कुंबळे दरम्यान झालेल्या अपघातात कल्पेश प्रकाश आदावडे (३५, मूळ रा. चिखलगाव-दापोली) हा जागीच ठार झाला. तर विलास पांडुरंग मोहिते (४८, रा. मंडणगड) हा गंभीर जखमी झाला. रविवारी सकाळी ८.३० वाजता हा अपघात घडला.

याबाबत विलास मोहीते यांनी मंडणगड पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली आहे. मयत कल्पेश हा (एमएच ०८ एबी ४४२२) याला दुचाकी चालवत असताना झोपेची डुलकी आली आणि दुचाकी रस्त्याबाहेर जाऊन बाजूच्या खड्यात कोसळली. यात कल्पेश जागीच ठार झाला. तर मोहिते गंभीर जखमी झाले. याप्रकरणी मंडणगड पोलीस ठाण्यात मयत कल्पेशविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रस्त्यात कोणताही अडथळा नसताना रस्त्याची विशिष्ठ परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने बेदरकारपणे चालवून अपघात करत स्वतःच्या मृत्यूस तसेच मोहिते याच्या दुखापतीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कल्पेशवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसऱ्या अपघातात महिला गंभीर

आंबडवे-लोणंद महामार्गावर शिरगाव येथे चालकाने रस्त्याची विशिष्ठ परिस्थिती लक्षात न घेता अतिवेगाने गाडी चालवत चुकीच्या बाजूने आपल्या ताब्यातील मारुती स्विफ्ट कार रस्त्याचे बाजूला असलेल्या मेटल बॅरीकेडला धडकविल्याने झालेल्या अपघातात महिला डॉक्टर सबिया असद मुल्ला (३२, रा. गोरेगाव-रायगड) गंभीर जखमी झाल्या. शनिवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. मुल्ला यांच्यावर भिंगळोली येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करुन अधिक उपचाराकरिता मुंबई येथे पाठविण्यात आले. या अपघातात गाडीचे प्रचंड नुकसान झाले आहे व अपघाग्रस्त महिला मृत्यूशी झुंज देत असल्याची माहिती मंडणगड ग्रामीण रुग्णालय येथून देण्यात आली.