दोनशे तोळे सोन्याच्या लुटीत स्थानिक कनेक्शन? पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली

रत्नागिरी:- राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा फोडून सुमारे ९० लाख रुपये किमंतीचे २०० तोळे पेक्षा जास्त सोने लांबविल्याच्या प्रकरणाच्या तपासासाठी जिल्हा पोलीसांनी विविधे पथक स्थापन केली आहे. नाटे पोलीसांसह स्थानिक गुन्हे शाखेचे स्वतंत्र पथक दरोडेखोरांचा शोध घेत आहे. मात्र राजापूर तालुक्यातील अतिशय दुर्गम व किनारपट्टीवर असलेल्या गावात दरोडेखोर आले कोठून याचा शोध पोलीसांनी सुरु केला आहे. स्थानिकाचा मदतीशिवाय पतसंस्थेवर दरोडा टाकणे शक्य नसल्याचा पोलीसांच्या संशय असून त्यादृष्टीने पोलीसांनी आपली तपासाची दिशा निश्चित केली आहे. दरोड्याचे ‘स्थानिक कनेक्शन’ तपासण्यासाठी गाव व परिसरात गावाबाहेरून आलेल्या व्यक्तींचा पोलीसांनी शोध सुरु केला आहे. दरोडेखोरांना लवकरच जेरबंद करु असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व अप्पर पोलीस अधीक्षक श्रीमती जयश्री गायकवाड यांनी व्यक्त केला आहे.

साखर येथील श्रमिक पतसंस्थेची शाखा मिठगवाणे ग्रामपंचायतीच्या कार्यालयातील एका छोट्याश्या जागेत आहे. तेथील उलाढाला मोठी आहे. शाखा दिसायला लहान असली तरीही स्थानिक महिला छोटे व्यावसाय व घरगुती कामासाठी पतसंस्थेत दागिने ठेवून पैसे काढतात. त्याच्या परतफेडीचा कालावधीही वेळेत असल्यामुळे श्रमिक पतसंस्थेची मिठगवाणे शाखा उत्तमरित्या सुरु आहे. शाखेत मोठ्याप्रमाणात सोने तारण कर्जाची उचल होत असल्याची माहिती असलेल्या व्यक्तीने किंवा त्याच्या माहितीवरुन अन्य दरोडेखोरांनी हा दरोडा टाकल्याची शक्यता आहे. मात्र या दरोड्याचे मुळ स्थानिकांशी जोडलेले असल्याची शक्यता अधिक असल्याचे पोलीसांचे म्हणणे आहे.
सोमवारी मध्यरात्री शाखेचा कडीकोयडा तोडून चोरट्यांनी आत प्रवेश केला. केवळ सोने असलेले कपाट फोडून त्यांनी आतील सोने लांबविले. सोन्याच्या सुरक्षिततेसाठी आश्यक दक्षता पतसंस्थेने घेतलेली नसल्याची माहिती दरोडेखोरांना असल्याची शक्यता आहे. केवळ सोने असलेली तिजोरी बाहेरील चोरट्यांना कशी समजू शकते असा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलीसांच्या श्वन पथाकानेही घटनास्थळीची तपासणी केली आहे. पोलीसांच्या स्वतंत्र पथकासह तांत्रिक टिम घटनास्थळी दाखल आहे. तीही परिसारात चोरट्याचा माग काढत आहे.

मिठगवाणे दुर्गम भाग असल्यामुळे पोलीसांना तपास करतानाही अनेक अडथळे येत आहे. शहरी भागाप्रमाणे पोलीसांना तात्काळ माहिती उपलब्ध होत नसल्यामुळे आता स्थानिक कनेक्शनवर तपासाचे भावितव्य अवलंबून आहे. मात्र दरोड्याचा तपास वेगात सुरु असुन लवकरच दरोडेखोरांना गजाआड करु असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.

शृंगारतळी येथील चोरटे लवकरच जेरबंद ?
शृंगारतळी येथील मोबाईल शॉपी फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ३० लाखांचे मोबाईल लंपास केले होते. या गुन्ह्याचा तपास वेगात सुरु असून आम्ही लावकरच चोरट्यांना गजाआड करु असा विश्वास पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे. चोरट्याचा माग काढण्यात पोलीसांना यश येत आहे. चोरटे ज्या मार्गाने शृंगारतळी येथे दाखल झाले. तो मार्ग पोलीसांना सापडला असून त्यादृष्टीने पोलीसांनी तपास सुरु केला आहे.