दुकानासमोर प्राण्याची कवटी ठेवून जादूटोण्याचा प्रयत्न, अज्ञातावर गुन्हा
रत्नागिरी:- रत्नागिरी तालुक्यातील देवूड कसबेवाडी येथे एका किराणा दुकानासमोर अघोरी विधी करून दहशत माजवण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. दुकानासमोर लिंबू, नारळ आणि प्राण्याची कवटी ठेवून तांत्रिक पूजा केल्याप्रकरणी रत्नागिरी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी सुनील शांताराम गोताड (वय ४६, रा. देवूड कसबेवाडी) यांचे गावात ‘मे. लक्ष्मी स्टोअर्स’ नावाचे किराणा मालाचे दुकान आहे. दि. २७ मार्च रोजी रात्री ८ वाजल्यापासून ते २८ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजेच्या दरम्यान ही घटना घडली. सुनील गोताड जेव्हा आपल्या दुकानासमोर गेले, तेव्हा त्यांना एका काजूच्या झाडाखाली अघोरी पूजा मांडलेली दिसली.
अज्ञात इसमाने फिर्यादी व त्यांच्या कुटुंबाचे नुकसान व्हावे या उद्देशाने दुकानासमोर केळीच्या पानावर एक लिंबू, एक नारळ आणि एका प्राण्याची जुनाट लहान आकाराची कवटी ठेवून तांत्रिक पूजा केली होती. या अघोरी कृत्यामुळे गोताड आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात भीती आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याप्रकरणी सुनील गोताड यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी पोलिसांनी अज्ञात आरोपीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३ (२) नुसार गुन्हा नोंदवला आहे. २९ मार्च रोजी पहाटे २ वाजता हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस या मागील सूत्रधाराचा शोध घेत आहेत.









