खेड:- तालुक्यातील कुरवळ-खेड येथील श्री केदार भैरी मानाई मंदिरात ९ महिन्यापूर्वी झालेल्या देवीच्या पावणेतीन लाख रुपये किंमतीच्या दागिने चोरी प्रकरणाचा येथील पोलिसांनी अखेर छडा लावला. मंदिराचा पुजारी शिवलिंग सीताराम जंगम (३५) यालाच पोलिसांनी गजाआड केले. त्याच्याकडून चोरलेले देवीचे दागिनेही हस्तगत केले.
डिसेंबर महिन्यात मंदिरातील देवीचे २ लाख ८५ हजार रुपये किंमतीचे दागिने चोरट्याने लंपास केले होते. या चोरीप्रकरणी येथील पोलीस ठाण्यात जुलै महिन्यात रिततसर तक्रार दाखल करण्यात आली होती.
त्यानुसार अज्ञात चोरट्यावर येथील पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला होता. या चोरीचा छडा लावण्यासाठी गावकऱ्यांकडून पोलिसांकडे आग्रहही धरण्यात आला होता. त्यानुसार पोलीस उपविभागीय अधिकारी शैलेश सणस, पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीकृष्ण येवले यांनी साऱ्या शक्यतांचा पडताळा करत देवीच्या दागिने चोरीप्रकरणी पुजाऱ्याच्याच मुसक्या आवळल्या. पूजाऱ्यानेही देवीचे दागिने चोरल्याची कबुली पोलिसांना दिली. त्यानुसार पुजाऱ्याने चोरलेले दागिनेही हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. येथील पोलिसांनी चोरी प्रकरणाचा छडा लावलेल्या कामगिरीबद्दल ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.









