देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे येथे बस- तवेराचा समोरासमोर अपघात

संगमेश्वर:- देवरुख-संगमेश्वर मार्गावरील करंबेळे खाकेवाडी बस थांब्यासमोर तवेरा कार व खाजगी आराम बस यांचा आज सकाळी 6.30 वाजता अपघात झाला. या अपघातात तवेरा चालक गंभीर जखमी झाला असून तवेरामधील अन्य काहीजण जखमी झाल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. 

या अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार खासगी आराम बस मुंबईतून देवरूखकडे येत होती. तर तवेरा कार देवरूखहून संगमेश्वरच्या दिशेने जात होती. ही दोन्ही वाहने करंबेळे – खाकेवाडी बसथांब्याजवळ आली असता त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, तवेरा कारच्या दर्शनी बाजूचा चक्काचूर झाला. या अपघातात तवेरा चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक काहीकाळ ठप्प झाली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच देवरूख पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.