देवरुख:- शहरातील केशवसृष्टी येथे घरात वृद्ध महिला एकटीच असल्याचे संधी साधून चोरट्याने ४ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एका तरुणीवर देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवरुख पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, याबाबत नेहां संतोष जोशी यांनी फिर्याद दिली. समृध्दी संतोष लवटे (२५, रा. कारलेकर गर्दी
खानभाग सांगली, सध्या रा. देवरुख) असे संशयित तरुणीचे नाव आहे. नेहा जोशी या ५ व ६ मै २०२५ रोजी पाध्ये स्कूल येथे शिबिरासाठी गेल्या होत्या. घरामध्ये त्यांची वयोवृद्ध सासू शालिनी जोशी होत्या. शालिनी जोशी या घरी एकट्याच असल्याने त्यांच्या सोबत झोपण्यासाठी पेईंग गेस्ट म्हणून राहणारी समृध्दी लवटे आली होती. नेहा जोशी या ६ जून रोजी सकाळी ७ वाजता घरी आल्या असता घराचा मुख्य दरवाजा अर्धवट उघडलेला दिसला. आतमध्ये प्रवेश केला असता बेडरुममधील कपाटाचे झडप उघडे दिसले. यामुळे जोशी यांचा संशय बळावला. जोशी यांनी कपाटातील जॅकेटमध्ये ठेवलेल्या दागिन्यांची पाहणी केली असता २ सोन्याच्या पाटल्या दिसून आल्या नाहीत. सर्वत्र शोधाशोध करूनही दागिने सापडले नाहीत. या प्रकरणी जोशी यांनी ४ लाख २० हजाराचे सोन्याचे दागिन्यांची चोरी झाल्याची फिर्याद गुरुवार १४ ऑ गस्ट रोजी देवरुख पोलीस ठाण्यात दिली. तसेच समृद्धी लवटे हिच्यावर संशय व्यक्त केला असून तसे फिर्यादीतही नमूद केले आहे. फिर्यादीनुसार लवटे हिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास देवरुख पोलीस करीत आहेत.