रत्नागिरी पोलिसांनी चौघांच्या मुसक्या आवळल्या
रत्नागिरी:- देवरुख येथील एका सोने व्यावसायिकाच्या अपहरणाच्या आणि खंडणीच्या गुन्ह्यात रत्नागिरी पोलिसांनी अवघ्या काही दिवसात धडाकेबाज कारवाई केली आहे. सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या अपहरण प्रकरणात पोलिसांनी चार जणांच्या टोळीला अटक केली आहे.
१७ सप्टेंबर रोजी रात्री १०:३० ते १०:४५ च्या सुमारास सोने व्यावसायिक धनंजय गोपाळ केतकर त्यांच्या मर्सिडीज गाडी (क्र. एमएच-०१-ई-८०१२) घरी जात असताना, वांझोळे गावात एका पांढऱ्या कारने त्यांच्या गाडीला थांबवले. त्या गाडीतील अनोळखी पाच इसमांनी केतकर यांना जबरदस्तीने त्यांच्या गाडीत बसवले होते.
अपहरणकर्त्यांनी श्री. केतकर यांच्या गळ्यातील १६ लाख रुपये किमतीच्या तीन सोन्याच्या चेन आणि खिशात असलेले २० हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले होते. त्यानंतर, “तुला सोडायचे किती पैसे देणार व कुठे देणार” असे विचारून त्यांनी ५ लाख रुपयांच्या खंडणीची मागणी देखील केली होती. तसेच, त्यांच्या डोक्यात कठीण वस्तू मारून दरीत टाकून देण्याची धमकीही दिली. अपहरणकर्त्यांनी १८ सप्टेंबर रोजी रात्री १२:३० च्या सुमारास त्यांना वाटुळ गावातील रस्त्यावर सोडून देत पोबारा केला होता.
सोने व्यावसायिक धनंजय केतकर यांच्या तक्रारीवरून देवरुख पोलीस ठाण्यात १० अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गंभीर घटनेची दखल तात्काळ पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी घेत वेगवेगळ्या तपास पथकांना वेगवेगळ्या ठिकाणी रवाना केले. या दरम्यान स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार विजय आंबेकर यांच्या तांत्रिक आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपी बदलापूर, ठाणे येथे असल्याचे निष्पन्न झाले. तपास पथकांनी बदलापूरमधून दोन आरोपींना ताब्यात घेतले आणि पुढील तपासातून पनवेल, नवी मुंबई येथून आणखी दोन आरोपींना अटक केली.
या कारवाईत पोलिसांनी अपहरणकर्त्यांनी गुन्ह्यात वापरलेली एक स्कॉर्पिओ गाडी, ५ मोबाईल हँडसेट आणि १ लाख २० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण ६ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास देवरुख पोलीस ठाणे करत आहे.
ही यशस्वी कामगिरी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा उपविभाग सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे आणि देवरूख पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय झावरे यांच्या पथकाने केली. या पथकात इतर अनेक पोलीस अधिकारी व अंमलदार यांचाही समावेश होता.