दुर्वास पाटीलचे वडील पोलिसांच्या ताब्यात

खून प्रकरणात दर्शन पाटीलच्या सहभागाची होणार चौकशी

रत्नागिरी:- दुर्वास पाटीलने केलेल्या तिहेरी खून प्रकरणाचा तपास रत्नागिरी पोलिसांनी युद्धपातळीवर सुरु केला आहे. मुख्य आरोपी दुर्वास आणि त्याचे तीन साथीदार सध्या पोलीस कोठडीत आहेत. ज्या ठिकाणी दोन खून झाले, तो सायली बार राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सील करण्यात आला आहे. तर दुर्वासचे वडील दर्शन पाटील यालाही चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

सील करण्यात आलेल्या बारमधूनच मयत भक्ती मयेकर हिचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्यामुळे या प्रकरणात अजून काही माहिती पोलिसांच्या हाती लागण्याची शक्यता आहे. दुर्वासने आधी केलेल्या दोन खून प्रकरणातील एकामध्ये त्याचे वडील, अर्थात सायली बार चालक दर्शन पाटील याचाही सहभाग असल्याची प्रथमदर्शनी माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. त्या दृष्टीने पोलीस यंत्रणा तपास करत आहे.

भक्तीचा मोबाईल मिळाल्याने त्यावरुन करण्यात आलेले कॉल, चॅटिंग अशा स्वरूपाचे काही पुरावे पोलीस तपासात समोर येण्याची शक्यता आहे. या क्रमांकाचा सीडीआर तपासला जाणार आहे. गरोदर असल्याने लग्नाचा तगादा लावणाऱ्या व लग्नात अडथळा ठरणाऱ्या भक्तीचा खून प्रकरणात दुर्वास पाटील व त्याचे दोन साथीदार अटक करण्यात आले. त्यानंतर आणखी दोन खून दुर्वास पाटील यानेच केल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

रत्नागिरी तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे प्रेमसंबंधातून 26 वर्षीय भक्ती मयेकर (रा. मिरजोळे नाखरेकरवाडी, रत्नागिरी) हिचा सायली बारमधील वरच्या रूममध्ये केबलने गळा आवळून खून केला होता. याआधी बारमध्येच काम करणारा सिताराम वीर हा भक्तीशी फोनवर बोलतो या रागातून त्याला जबर मारहाण केली होती. त्याला चक्कर आली असे सांगून रिक्षा करून घरी पाठवले मात्र त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.

वर्षभरापूर्वी सितारामला केलेली मारहाण व त्यानंतर त्याचा झालेला मृत्यू याची माहिती 28 वर्षीय राकेश जंगम (वाटद, खंडाळा) याला होती म्हणून त्याचाही खून करून मृतदेह आंबा घाटात टाकल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. गेल्या वर्षी जून मध्येच राकेश बेपत्ता झाल्याची तक्रार त्याच्या आईने जयगड पोलिसात केली होती.

दुर्वास पाटील याने विश्वास पवार आणि सुशांत नरळकर या दोन साथीदारांच्या मदतीने 16 ऑगस्ट रोजी भक्तीचा खून करण्यात आला होता. त्यानंतर पुरावा नष्ट करण्यासाठी तिचा मृतदेह आंबा घाटात फेकून दिला होता. या सगळ्या प्रकरणांची गंभीर दखल घेऊन सखोल चौकशी दुर्वास पाटील याला फाशीची शिक्षा व्हावी, त्याच्या बापाचीही चौकशी व्हावी, अशी मागणी करत या प्रकरणात काही खळबळजनक आरोप रत्नागिरी येथील सामाजिक कार्यकर्त्या संध्या कोसुंबकर यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे केले आहेत.

रत्नागिरीतील या सगळ्या खून प्रकरणांची जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी या सगळ्या प्रकरणांची गंभीर दाखल घेतली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक बाबुराव महामुनी, रत्नागिरी जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे, रत्नागिरी शहर पोलीस निरीक्षक विवेक पाटील या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.