दुरुस्तीसाठी तीन धरणातील पाणीसाठा सोडल्याने टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये 39 वाड्यांची भर

रत्नागिरी:- संगमेश्‍वमधील एक आणि मंडणगडमधील तिन धरणातील पाणीसाठा दुरुस्तीसाठी सोडून देण्याचा निर्णय घेतल्यामुळे त्यावर अवलंबून असलेल्या सुमारे 39 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये भर पडली आहे. सध्या 64 गावातील 117 वाड्यांना 10 टँकरद्वारे पाणी पुरवले जात आहे. 18 हजार 766 लोकांना टँकरचा आधार आहे.

यंदा मॉन्सून लवकर दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असली तरीही अजून उन्हाचा कडाका जाणवत आहे. त्यामुळे भुजल पातळी खालावलेली असून विहिरी, तळी या पाण्याच्या स्रोतांमध्ये खडखडाट आहे. परिणामी जिल्ह्यातील पाणी टंचाईत वाढ होत आहे. पाणी मिळत नसल्याने टँकरचा आधार ग्रामस्थांकडून घेतला जात आहे. ही परिस्थिती उद्भवलेली असतानाच पावसाळ्यापुर्वीच्या दुरुस्तीसाठी काही धरणातील पाणी साठा कमी करण्यात येत आहे. संगमेश्‍वर तालुक्यातील उमरे येथील पाणी सोडण्यात आले आहे. तर मंडणगड तालुक्यातील भोळवली, चिंचाळ, पंणदेरी या क्षेत्रातील पाणी कमी झाल्यामुळे त्यावर आधारीत नळ योजनांचे पाणी बंद झाले आहे. ऐन उन्हाळ्यात तेथील ग्रामस्थांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. उमरेतील एका धरणावर 11 वाड्या तर मंडणगडमधील तिन धरणांवर 28 वाड्यांचा पाणी पुरवठा अवलंबून होता. धरणातील पाणी कमी झाल्याच्या वृत्ताला जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाच्या अधिकार्‍यांनी दुजोरा दिला आहे. तेथील लोकांची गैरसोय टाळण्यासाठी टँकरने पाणी सुरु करण्यात आले आहे. तशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून करण्यात आली होती. यंदा जलजीवन मिशनमुळे टंचाई आराखड्यात मोठी घट झाली होती; परंतु मानवनिर्मिती कारणांमुळे टंचाईग्रस्त वाड्यांची आकडेवारी वाढली आहे. गतवर्षी याच कालावधीत 64 गावातील 106 वाड्यांना टँकरने पाणी पुरवले जात होते. यंदा 117 वाड्यांना टँकरचा आधार आहे. आतापर्यंत 615 टँकरच्या फेर्‍या झाल्या असल्याचे पाणी पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.