पोलिसांकडून दुचाकी चोरास 24 तासात बेड्या

दापोली:-दापोली तालुक्यातील शिवाजीनगर किरंबा येथे राहणारे दिपेश पवार यांची दुचाकी चोरीची नोंद झाल्यापासून 24 तासाच्या आत चोरट्याला जेरबंद करण्यास दापोली पोलिसांना यश आले आहे.

किरंबा शिवाजीनगर येथील दिपेश पवार याची दुचाकी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना शनिवार 6 जानेवारी रोजी घडली होती. त्याची फिर्याद दिपेश पवार यांनी दापोली पोलीस स्थानकात दिली होती. अज्ञात चोरट्याविरोधात कलम 379 प्रमाणे दापोली पोलीस स्थानकात याची नोंद करण्यात आली होती. गुन्हा दाखल झाल्यानंतर पेट्रोलिंगदरम्यान सोफियान महाते (25, रा.मांदिवली मोहल्ला) हा ती चोरीला गेलेल्या गाडीसह संशयितरित्या आढळला. त्याच्याकडे चौकशी केली असता ही गाडी त्याने चोरून आणल्याची कबुली दिली. आरोपी सुफियान महाते याला तत्काळ दापोली पोलिसांनी ताब्यात घेतले व गाडी जप्त करण्यात आली. गाडी चोरीची नोंद होताच शोध घेण्यासाठी दापोली पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल गायकवाड, पोलीस नाईक राजेंद्र नलावडे, पोलीस कॉन्स्टेबल मोरे यांनी तत्काळ गुन्ह्याचा तपास लावून आरोपी ताब्यात घेतला. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस नाईक राजेंद्र नलावडे करीत आहेत.