दुचाकी खरेदीसाठी आला, जयस्तंभ येथून दुचाकी घेऊन पळाला

रत्नागिरी:- शहरातील मुख्य गजबजलेल्या जयस्तंभ श्री झेरॉक्स येथे गाडी खरेदी करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने तुमची गाडी मला द्या, बँकेतून पैसे घेऊन येतो असे सांगत गाडी घेऊन गेलेला इसम परत आलाच नाही. याबाबतची फिर्याद इम्रान जलाल पावसकर (२१, केळये मजगाव, रत्नागिरी) याने शहर पोलीस स्थानकात दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ओएलक्सवर ऍपवर पाहिलेली गाडी खरेदी करण्यासाठी जयस्तंभ श्री झेरॉक्स समोर कोल्हापूर येथील सलमान तांबोळी ( ३५ ) हा आला होता. यावेळी त्याने बँकेतून पैसे घेऊन येतो. तुमची दुचाकी देता का ? असे सांगितले. त्यानुसार ४० हजार रुपये किंमतीची टीव्हीएस कंपनीची इनटोर्क गाडी घेऊन गेला. मात्र बराच वेळ झाला तरी तो न परतल्याने आपली फसवणूक झाल्याची तक्रार पावसकर याने शहर पोलीस स्थानकात दिली. त्यानुसार सलमान तांबोळी याच्यावर भादविकलम ४०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.