दापोली:- दापोली येथे फिरायला आलेल्या एका १८ वर्षीय तरुणाचा दुचाकी घसरून झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला आहे. आधी चिपळूण आणि नंतर मुंबईतील सायन रुग्णालयात उपचार सुरू असताना या तरुणाची प्राणज्योत मालवली. सुरज मनोहर उके (वय १८ वर्षे, रा. नालासोपारा पूर्व, पालघर) असे मयत तरुणाचे नाव आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुरज उके हा ९ मे रोजी दापोली परिसरात आला होता. सायंकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास दापोली तालुक्यातील दळखण येथे त्याची मोटरसायकल अचानक स्लिप झाली. या भीषण अपघातात सुरजच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर दुखापत झाली होती.
अपघात झाल्यानंतर सुरजला वाचवण्यासाठी नातेवाईक आणि स्थानिक प्रशासनाने शर्थीचे प्रयत्न केले. ९ मे रोजी अपघातानंतर त्याला तातडीने प्रथम शासकीय रुग्णालय दापोली येथे दाखल करण्यात आले. १० मे ला प्रकृती अधिक चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी त्याला तातडीने डेरवण रुग्णालय, चिपळूण येथे हलवण्यात आले. ११ मे पर्यंत प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने अत्यंत गंभीर अवस्थेत त्याला मुंबईतील लोकमान्य टिळक (सायन) रुग्णालयात रात्री ०२:१५ वाजता आणून दाखल करण्यात आले. सायन रुग्णालयात गेली तीन दिवस त्याच्यावर अतिदक्षता विभागात औषधोपचार सुरू होते. मात्र, त्याची प्रकृती खालावत गेली. शेवटी १४ मे रोजी पहाटे ०३:१५ वाजता कर्तव्यावरील डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.
याप्रकरणी मुंबईतील सायन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी शून्य क्रमांकाने अकस्मात मृत्यूची नोंद करून कायदेशीर कागदपत्रे पुढील तपासासाठी दापोली/रत्नागिरी पोलिसांकडे रवाना केली होती. ही कागदपत्रे १९ मे रोजी रात्री ११ वाजता प्राप्त झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी अकस्मात मृत्यू भारतीय नागरिक सुरक्षा संहिताच्या कलम १९४ अन्वये नोंदवून घेतली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे नालासोपारा परिसरात आणि उके कुटुंबावर शोककळा पसरली आहे.









