दुचाकी अपघातात जखमी तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

दापोली:- मोटारसायकल घसरून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका तरुणाचा मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. १६ सप्टेंबर २०२५ रोजी झालेल्या या अपघातानंतर पाच दिवस कोमामध्ये राहून २२ सप्टेंबर रोजी त्याची प्राणज्योत मालवली. प्रकाश पांडुरंग चोगले (वय ४३, रा. वणंद, पो. कांगणेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. प्रकाश चोगले हे सेंट्रींगचे काम करत होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत प्रकाश चोगले हे १६ सप्टेंबर २०२५ रोजी दापोली तालुक्यातील जालगाव येथे त्यांच्या ऍक्टिव्हा मोटारसायकलवरून घसरून पडले. या अपघातात त्यांच्या पाठीमागील बाजूस गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर त्यांना तातडीने दापोली येथील सिव्हील हॉस्पिटल आणि त्यानंतर डेरवण येथील वालावलकर हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारांसाठी नेण्यात आले. मात्र, प्राथमिक उपचार केंद्रांवर अपुऱ्या सुविधा असल्यामुळे पुढील आणि अधिक चांगल्या उपचारांसाठी त्यांना १७ सप्टेंबर २०२५ रोजी तातडीने मुंबईतील सर जे.जे. रुग्णालयात हलवण्यात आले. १७ सप्टेंबरच्या मध्यरात्री १.५० वाजता डॉक्टरांनी त्यांना तपासणी करून वॉर्ड क्रमांक ०४ मध्ये दाखल करून घेतले.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांचे तातडीने सीटी स्कॅन केले. स्कॅनमध्ये त्यांच्या मेंदूला गंभीर मार लागल्याचे निदान झाले, त्यामुळे डॉक्टरांनी तत्काळ ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार, १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७ वाजता त्यांच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
शस्त्रक्रिया यशस्वी झाली, मात्र त्यानंतर प्रकाश चोगले यांना शुद्ध आलीच नाही. डॉक्टरांनी तपासणी करून ते कोमामध्ये असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे स्पष्ट केले. वॉर्ड क्रमांक २५ मध्ये त्यांच्यावर सघन उपचार सुरू असताना, २२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.३० वाजता डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.

या दुर्दैवी अपघाती मृत्यूची नोंद सर जे.जे. रुग्णालय पोलिसांनी घेतली असून, घटनेची माहिती दापोली पोलिसांना देण्यात आली. दापोली पोलिसांनी या प्रकरणी २७ सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ४.४२ वाजता अकस्मात मृत्यूची नोंद (आमू. क्र. ६६/२०२५) केली आहे. मोटारसायकल अपघातामुळे एका तरुण कामगाराचा असा अकाली मृत्यू झाल्याने वणंद आणि कांगणेवाडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.