चिपळूण शहरातील काविळतळी येथील घटना
चिपळूण:- शहरातील काविळतळी येथे असलेल्या कोयना ग्लास ॲण्ड ॲल्युमिनियम दुकान फोडून त्यातून ७६ हजार किंमतीचे ॲल्युमिनियम साहित्य चोरीस गेल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात शुक्रवारी अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद पवन दिलीप संकपाळ (३८, कळंबस्ते) यांनी दिली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २२ डिसेंबर रोजी रात्री ८ ते २३ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजण्याच्या कालावधीत कोयना ग्लास अॅण्ड ॲल्युमिनियम दुकानाच्या शेडच्या मागील पत्र्याचे चोरट्याने नटबोल्ट काढून दुकानात प्रवेश केला. यावेळी चोरट्याने ६० हजार रुपये किंमतीच्या ॲल्युमिनियम खिडकीला बसवण्याच्या वेगवेगळ्या आकाराच्या पट्ट्यांचे तीन बंडल, १० हजार किंमतीच्या पट्ट्यांचे लहान-मोठे तुकडे, ६ हजार किंमतीच्या ॲल्युमिनियम साडेचार बाय चार फुट लांबी-रुंदीच्या खिडकीच्या तयार एकूण सात फ्रेम असे ७६ हजार किंमतीचे साहित्य चोरून नेले. हा प्रकार पवन संकपाळ याच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.









