रत्नागिरी:- सरोवर संवर्धानेंतर्गत मंजूर झालेल्या निधीचा दीड कोटीचा गायब झालेला धनादेश जिल्हा परिषदेतील एका अधिकार्याच्या केबीनला लटकलेला सापडल्यानंतर खळबळ उडाली होती. दीड वर्षात हा धनादेश कुठे होता, अचानक दरवाज्यावर कुणी लावून ठेवला याची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी दिले आहेत. यामध्ये कर्मचारी दोषी आहेत की अधिकारी यावरुन तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत.
तत्कालीन पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनी सरोवर संवर्धनांतर्गत एक कोटी 47 लाख रूपयांचा निधी खेड तालुक्यातील सवेणी व घेरापालगड येथील दोन तलावांचे नूतनीकरण, सुशोभिकरणासाठी मंजूर करवून आणला होता. यामध्ये सवेणीसाठी 1 कोटी 25 लाख तर घेरापालगडसाठी 12 लाख 82 हजार रूपयांचा समावशे होता. या दोन कामांचे दोन धनादेश खेड पंचायत समितीमार्फत जिल्हा परिषदेकडे 14 जून 2019 ला पाठवण्यात आल्याची नोंद आहे. याबाबत आमदार योगेश कदम यांनी पाठपुरावा करण्यास सुरवात केली होती. तो धनादेश पुढे कुठे गायब झाला हे पुढे येत नव्हते. काही दिवसांपुर्वी धनादेश जिल्हा परिषदेतील मुख्य लेखाधिकारी यांच्या केबिनच्या दरवाजावर लटकताना सापडला. त्यानंतर जिल्हा परिषदेत उलटसुलट चर्चांना सुरवात झाली. या गंभीर प्रकारामुळे संबंधित विभागाच्या कारभाराबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तो धनादेश आला कुठून, टपालातून आला असेल तर तो कुणी पाठवला याच्या मुळात जाण्यासाठी जि. प. प्रशासन कामाला लागले आहे. दीड वर्ष हा धनादेश जिल्हा परिषदेच्या खात्यात जमा केला असता तर त्यावरील व्याज मिळाले असते. तो कालबाह्य झाला तर निधी परत जाण्याची शक्यताही नाकारता येत नाही. यादृष्टीनेही चौकशी सुरु झाली आहे. हे दोन्ही गोष्टींना जबाबदार कोण याचा शोध घेण्यास सुरवात झाली आहे. या सर्व प्रकाराबाबत अध्यक्ष रोहन बने यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदूराणी जाखड यांना चौकशी करण्याची सूचना केली होती. त्यानुसार मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. यामध्ये दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर कोणत्या प्रकारची कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे. हा धनादेश जाणूनबुजून गायब केल्याचा आरोप सदस्य आण्णा कदम यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे.









