दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारपेठ फुलली; कोट्यावधींची उलाढाल

रत्नागिरी:- कोकणातील घराघरात दिवाळीची तयारी सुरु आहे. तरीही रविवारी (ता. २३) रंगलेल्या विश्‍वचषक स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामन्याला तरुणांपासून प्रौढांपर्यंतच्या सर्वांचाच कल होता. अनेकांनी खरेदीसाठी सायंकाळनंतर बाजारपेठेत धाव घेतली होती; त्यामुळे दुपारी रत्नागिरी शहरातील बाजारपेठेत म्हणावी तशी गर्दी नव्हती. सायंकाळनंतर बाजारपेठा फुलल्या होत्या.

कोकणात दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याची पुर्वतयारी गेले चार दिवस सुरु आहे. घराघरामध्ये फराळ बनविण्याची गडबड उडाली आहे. ग्रामीण भागात हे चित्र सर्वाधिक पहायला मिळते, तर शहरामध्ये दुकानात तयार असलेला फराळ विकत घेण्यासाठी बाजारपेठांमध्ये गर्दी होते. वसूबरस, धनत्रयोदशी पारंपरिक पध्दतीने लोकांनी साजरी केली. सोमवारी (ता. २४) नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नानासाठी नागरिक सज्ज झाले आहेत. लक्ष्मीपुजनही त्याच दिवशी असल्यामुळे व्यापारीही त्यासाठी सज्ज झाले आहेत. कोरोनातील दोन वर्षानंतर येत असलेल्या दिवाळी सणाच्या खरेदीसाठी लोकांनी बाजारपेठेत गेले दोन दिवस गर्दी केली होती. मिठाई, कपडे, फटाके यासह विविध भेटवस्तूंच्या दुकानात ग्राहक ये-जा करत होते. व्यावसायीकांमध्येही समाधान व्यक्त केले जात होते.
दिवाळीच्या तयारीची कसरत सुरु असतानाच रविवारी दुपारी बारा वाजता भारत-पाकिस्तान हा सर्वांचा उत्सुकता वाढविणारा सामना रंगला होता. विश्‍वचषक स्पर्धेतील हा सामना असल्याने तो जिंकण्यासाठी अनेकांनी देव पाण्यात ठेवले होते. तरुण, प्रौढ, महिलांचे लक्ष टिव्हीकडे होते. शेवटच्या चेंडूपर्यंत सामना रंगल्याने रत्नागिरी शहरातील रस्त्यांवरही लोकांचा वर्दळ कमी होती. ग्रामीण भागातून खरेदीला आलेल्यां व्यतिरिक्त शहरी भागातील वर्गाचा बाजारपेठेतील राबता कमी होती. हे रामआळी, गोखलेनाका, धनजीनाका परिसरातील व्यापार्‍यांकडूनही सांगण्यात येत होते. एकदाचा भारत जिंकला आणि त्याच आनंदात तरुणांची पावले खरेदीकडे वळली. सायंकाळी रामआळीपासून पुढे बाजारपेठेच्या पुर्ण परिसरात ग्राहकांची खरेदीसाठी झुंबड उडालेली होती. बहूसंख्य लोकांनी भाऊबीजेची खरेदीही रविवारीच करुन घेतली होती. सर्वाधिक गर्दी सराफी, कपडे यांच्या दुकानात दिसत होती. बुधवारी (ता. २६) भाऊबीज असली तरीही लोकांचा कल त्यापुर्वीच खरेदी करण्यावर दिसत होता.