रत्नागिरी:- मागील चोवीस तासातील कोरोनाची आकडेवारी जिल्हावासीयांसाठी दिलासादायक ठरली आहे. आलेल्या अहवालानुसार बाधित रुग्ण आणि मृत्यू संख्येत देखील मोठी घट झाली आहे. चोवीस तासात जिल्ह्यात केवळ 56 पॉझिटिव्ह रुग्ण तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णसंख्या सातत्याने घटत असल्याचे चित्र आहे. मात्र वाढणारी मृत्यूसंख्या आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत होती. मात्र शुक्रवारी आलेल्या अहवालाने प्रशासनासह रत्नागिरीकरांना देखील दिलासा दिला आहे.
शुक्रवारी आलेल्या अहवालांमध्ये जिल्ह्यात 575 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाला आहे. आता पर्यंत आलेल्या अहवालानुसार 42 हजार 13 जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. गुरुवारी तब्बल 88 जणांनी कोरोनावर मात केली. आता पर्यंत 7 हजार 38 कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे तर 291 जणांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
नव्याने आलेल्या अहवालानुसार पॉझिटिव्ह आलेल्या 56 रुग्णांमध्ये आरटिपीसीआर टेस्ट केलेले 28 तर अँटिजेन टेस्ट केलेल्या 28 रुग्णांचा समावेश आहे. यात रत्नागिरीत 24 रुग्ण, लांजा 2, राजापूर 5, कामथे 8, गुहागर 4, कळबनी 7, रायपाटण 1, मंडणगड 1 आणि दापोलीतील 4 रुग्णांचा समावेश आहे.









