दारु विक्रीवर पोलिसांची कारवाई ; संशयितांविरुद्ध गुन्हा

रत्नागिरी:- शहरातील एमआयडीसी-मिरजोळे, क्रांतीनगर झोपडपट्टीच्या आडोशाला विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत साहित्यासह २ हजार ३७० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला असून संशयितांविरुद्ध शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय संभाजी पाटील (३२), व शंकर भिमन्ना मादर (वय ३०) अशी संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. २७) सकाळी साडेदहा ते एक च्या सुमारास मिरजोळे व क्रांतीनगर झोपडपट्टी येथे निदर्शनास आल्या.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित पाटील यांच्याकडे विनापरवाना ५१० रुपयांची पाच लिटर दारु तर शंकर मादर यांच्या १ हजार ८६० रुपयांची १८ लिटर दारु सापडली. या प्रकरणी महिला पोलिस हवालदार योगिता नाटुस्कर व पोलिस हेड कॉस्टेबल उमेश पवार यांनी ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.