दाभोळ येथून खवले मांजराचे खवले जप्त; दोघांवर गुन्हा दाखल

दापोली:-  शहरातील दाभोळ मार्गावर असलेल्या पेट्रोल पंपासमोर मंगळवारी दुपारी  दापोली पोलीस व वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत एका संशयिताकडून ४ किलो ७०० ग्रॅम वजनाचे मांजराचे खवले जप्त करण्यात आले असून या प्रकरणी २ संशयितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका संशयिताला अटक करून न्यायालयात हजर केले असता त्याला पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. 

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दापोली पोलिसांना एक संशयित दापोली येथे खवले मांजराचे खवले विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाल्यावर उपनिरीक्षक निनाद कांबळे, हेड कॉन्स्टेबल अशोक गायकवाड, संदीप गुजर, रुपेश दिंडे, दापोलीचे वनपाल सावंत, वनरक्षक गणपत जळणे हे  दापोली शहरातील दाभोळ मार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सावजाची वाट पाहत थांबले होते.  दुपारी १.३० वाजण्याच्या सुमारास एक संशयित पाठीला सॅक लाऊन पेट्रोल पंपासमोरील चहाच्या टपरीजवळ येऊन थांबला.  त्याला या पथकाने घेरले व त्याच्या सॅकची झडती घेतली असता त्यात ४ किलो ७०० ग्रॅम वजनाचे खवले मांजराचे खवले आढळून आले.       

संशयिताचे नाव बळीराम नारायण उतेकर (वय ४२ वर्षे) रा. नागाव, फौजदारवाडी, ता. महाड ( जि. रायगड) असे असून तो संशयित तुकाराम नारायण शिंदे, रा. नेरूळनगर, खैरोली, ता. रोहा याच्या दुचाकीने त्याच्या सोबत दुचाकी क्रमांक एमएच.०६. बीआर. ३१४८ ने दापोली शहरातील आझाद मैदान पर्यंत आला होता. दापोली पोलसांनी संशयित बळीराम उतेकर याला अटक केली असून खवले जप्त केले आहेत. दापोली पोलीस ठाण्यात संशयित  बळीराम उतेकर व तुकाराम शिंदे यांचे विरोधात वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम ३९,४४,४८,५१ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पड्याळ करत आहेत.