‘मिशन फिनिक्स’ अंतर्गत रत्नागिरी पोलिसांची मोठी कारवाई
रत्नागिरी:- रत्नागिरी जिल्ह्याला अमली पदार्थमुक्त करण्याच्या उद्देशाने पोलीस दलाने हाती घेतलेल्या “मिशन फिनिक्स” अंतर्गत दापोली आणि मंडणगड तालुक्यांमध्ये मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत सुमारे 2 कोटी 22 लाख रुपये किमतीचे चरस सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत आतापर्यंत तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, एका फरार आरोपीचा ठाणे पोलिसांकडून ताबा घेण्यात येणार आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.वी. महामुनी यांच्या सूचनेनुसार सर्व पोलीस ठाणी अमली पदार्थ विरोधी कारवाईसाठी सज्ज झाली होती.
या अनुषंगाने, दि. १५ सप्टेंबर रोजी दापोली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी महेश तोरसकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे दापोलीतील केळशी किनारा मोहल्ला येथे छापा टाकण्यात आला. या छाप्यात, अनार इस्माईल डायली (वय-३२) याच्या राहत्या घरामागील पडवीतून गडद लाल आणि हिरव्या पॅकिंगमध्ये ठेवलेला चरस सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला. या वेष्टनावर ‘इन्झाजीत सिक्स गोल्ड’ (6-Gold) आणि कोरियन भाषेत मजकूर लिहिलेला होता. त्याच्या घरातून एकूण ०.९९८ किलोग्राम वजनाचा आणि सुमारे 24 लाख रुपये किमतीचा अमली पदार्थ मिळून आला. त्याच्यावर दापोली पोलीस ठाण्यात एन.डी.पी.एस. कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे (गु.र.नं. १७३/२०२५).
अनार डायली याच्याकडे केलेल्या कसून चौकशीनंतर हा चरस त्याला विक्रीच्या उद्देशाने केळशी मोहल्ला येथील अकिल अब्बास होडेकर (वय-४९) याने दिल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तातडीने अकिल होडेकर याला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान, अकिलने उर्वरित ४ चरसच्या पिशव्या मंडणगड तालुक्यातील साखरी गावाच्या समुद्रकिनाऱ्यावरील झुडपात लपवून ठेवल्याची कबुली दिली.
पोलिसांच्या पथकाने साखरी समुद्रकिनाऱ्यावर पंचनामा करून लपवून ठेवलेल्या ४ पिशव्या जप्त केल्या. साखरी समुद्रकिनाऱ्यावरून एकूण ४.७३१ किलोग्राम वजनाचा आणि सुमारे 2 कोटी 18 लाख ९२ हजार ४०० रुपये किमतीचा चरस मिळून आला.
दाखल गुन्ह्यात आतापर्यंत एकूण ५.७२९ किलोग्राम वजनाचा आणि 2 कोटी 22 लाख ९२ हजार ४०० रुपये किमतीचा चरस सदृश्य अमली पदार्थ जप्त करण्यात आला आहे. तपासात या गुन्ह्यात आणखी एका व्यक्तीचा सहभाग निष्पन्न झाल्याने तावीस महमूद डायली (वय ३०) या तिसऱ्या आरोपीलाही ताब्यात घेण्यात आले आहे.
या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच, ठाणे शहर येथील शिळ डायघर पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या (गु.र.नं. ८६७/२०२५) एन.डी.पी.एस. गुन्ह्यातील आरोपी ममुद बदुद्दीन ऐनटकर (वय-२९, रा. खोंडा, दापोली) याचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. रत्नागिरी पोलीस लवकरच त्याचा ठाणे न्यायालयाकडून ताबा घेणार असून, त्याच्याकडे अधिक चौकशी करण्यात येणार आहे. या कारवाईत आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन दत्तात्रय बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी.वी. महामुनी आणि उपविभागीय पोलीस अधिकारी खेड उपविभाग शैलेश सणस यांच्या मार्गदर्शनाखाली दापोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश तोरसकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. यादव व श्री. पाटील आणि स.पो.फो/गायकवाड, पो.हवा/मोहिते, पो.हवा/ढोले यांच्यासह पो.शि/ भांडे, पो.शि/ टेमकट, पो.शि/ दिडे व म.पो.शि/ पाटेकर यांनी ही धडक कारवाई यशस्वी केली.









