दापोली:- शहरातील लॉजवर धाड टाकून पोलिसांनी शहरात भर बाजारपेठेत सुरू असणाऱ्या वेश्या व्यवसायाची पोलखोल केली. यामुळे तालुक्यासह जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. या वेश्या व्यवसायाचा सूत्रधार विरेंद्र वेल्हाळ हा दापोलीतील गरीब व गरजू महिलांना वाममार्गाला लावून स्वतःची उपजीविका करत असल्याची धक्कादायक बाब व असे अनेक कारनामे पोलीस तपासात पुढे आले आहेत.
शहरात भर बाजारपेठेत एका हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर हे लॉज आहे. या लॉजच्या बाहेर एक हार्डवेअरचे दुकान आहे. येथे हा वेल्हाळ व त्याची चौकडी सदैव सावज शोधत बसलेली असायची. दापोलीतील गरीब व गरजू महिलांना हेरून त्यांना पैशाचे आमिष दाखवून त्यांना लॉजवर आणून ठेवत असे. यानंतर त्यांच्या नेहमीच्या बांधलेल्या गिऱ्हाईकांना संपर्क साधून पुढील कार्यभाग साधत असे.
याकरिता वेल्हाळ एका गिऱ्हाईकाकडून तब्बल दोन हजार रुपये आकारत असे. यातील त्या महिलेला किती रुपये देत होता व स्वतः किती रुपये ठेवत होता याचा तपशील अद्याप प्राप्त झालेला नाही. तरी देखील या किळसवाण्या व शोषणाच्या प्रकाराने अनेकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वेल्हाळ हा दापोलीमध्ये गिऱ्हाईक शोधून या महिलांचे लैंगिक शोषण करत असे. याकरिता त्याला अन्य कोण मदत करत होते का? याचा देखील पोलीस तपास करत आहेत. यामुळे वेल्हाळ यांच्या नियमित संपर्कात असणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. तसेच याप्रकरणी दापोली पोलिसांनी काळकाई कोंड येतील एका महिलेला देखील ताब्यात घेतले आहे.
हा व्यवसाय वेल्हाळ गेली बरीच वर्ष करत असल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यामुळे त्याने यापूर्वी आणखी किती महिलांचे लैंगिक शोषण केले याचा देखील पोलिसांनी तपास करत आहेत. वेल्हाळ हा श्रीमंत गिऱ्हाईकांसाठी व लॉजवर येऊ न शकणाऱ्या गिऱ्हाईकांना बाहेरच्या तालुक्यात अथवा मोठ्या शहरांमध्ये महिला पुरवत होता का याचादेखील पोलीस तपास करत आहेत.
अनेकांचे धाबे दणाणले
पोलीस यंत्रणा या प्रकरणाच्या मुळाशी गेली तरच अशा प्रकारांना आळा बसेल असे मत सुजाण नागरिकांतून व्यक्त होत आहे. मात्र या प्रकारामुळे वेल्हाळच्या पूर्वी संपर्कात असणाऱ्या अन्य महिला व नियमित संपर्कात असणाऱ्या अन्य गिऱ्हाईकांचे धाबे दणाणले आहे.