दापोली तहसील कार्यालयासमोर दुचाकी- कारचा अपघात

दापोली:- दापोली शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी भीषण अपघाताची घटना घडली असून दापोली-हर्णे मुख्य रस्त्यावर तहसील कार्यालयासमोर दुचाकी आणि चारचाकी वाहनाची जोरदार धडक झाली. मंगळवार, १ जानेवारी रोजी रात्री सुमारे १०.३० वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. धडकेचा आवाज इतका प्रचंड होता की परिसरात एकच खळबळ उडाली.

या अपघातात एकूण तीन जण जखमी झाले असून दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत जखमींना दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. चारचाकी (वाहन क्रमांक MH 12 LP 2112) चालवत असलेले प्रज्वल देवधर आणि त्यांच्या बाजूला बसलेले विराज वणे हे या अपघातात जखमी झाले आहेत. तसेच दुचाकी (क्रमांक MH 12 LQ 6847) चालवत असलेले सुदर्शन बहिरे हेही गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान, दुचाकी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची प्राथमिक माहिती मिळत असून पोलिसांकडून याबाबत तपास सुरू आहे. अपघातस्थळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना कायमस्वरूपी वाहने उभी राहत असल्याने रस्ता अरुंद झाल्याचे निदर्शनास येते. एका बाजूला स्कूल बस तर दुसऱ्या बाजूला फूड व्हॅन उभी राहत असल्यामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या ठिकाणची परिस्थिती अत्यंत धोकादायक बनली असून प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन रस्त्यावर अडथळा ठरणारी वाहने हटवावीत, वाहतूक नियमांची कठोर अंमलबजावणी करावी तसेच दोषींवर कडक कारवाई करावी, अशी ठाम मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.