दापोलीत १९ वर्षीय तरुणीची गळफास घेऊन आत्महत्या

दापोली:- दापोली येथील उपजिल्हा रुग्णालयात सोमवारी, २३ जून रोजी एका १९ वर्षीय तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संगीता कुमारी तलेश्वर कुमार मेहता (वय १९, रा. तलसरे, टिळेवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे. २३ जून २०२५ रोजी दुपारी २ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास संगीताने आपल्या रुममधील पंख्याला नायलॉनच्या दोरीने गळफास लावून घेतला.

हा प्रकार लक्षात येताच, तिला तातडीने एका खाजगी रुग्णवाहिकेने उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, तेथील डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर, दुपारी २ वाजून १५ मिनिटांनी तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच, दापोली पोलिसांनी अमृ. क्र. ४५/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता (BNSS) १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. २३ जून २०२५ रोजी सायंकाळी ४ वाजून १८ मिनिटांनी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आत्महत्येमागील नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.