दापोली:- दापोली तालुक्यातील मुरुड नवानगर येथे तब्बल ६ लाख ४० हजारांच्या सोन्याच्या दागिन्यांची घरफोडी झाल्याची घटना १९ नोव्हेंबरला उघडकीस आली. या प्रकरणी दापोली पोलिसांनी संशयित साहिम मुस्तफा ऐनरकर याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निखत रमीज ऐनरकर (३३, रा. मुरुड नवानगर) यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, १८ नोव्हेंबर दुपारी १.३० पासून १९ नोव्हेंबर सकाळी ६ वाजेपर्यंत घरात कोणीही नसल्याची संधी साधून आरोपीने चोरी केली. निखत यांच्या चुलत सासू फरीदा अन्य ठिकाणी गेल्याने घर रिकामे होते.
या वेळी संशयित साहिम ऐनरकर याने घराच्या छतावरील कौले सरकवून घरात प्रवेश केला. लाकडी कपाटाचे लॉक तसेच लॉकर तोडून त्यातील स्टीलच्या डब्यात ठेवलेले सोन्याचे दागिने चोरून नेले. चोरलेल्या ऐवजात ३ लाख ५० हजार रुपये किंमतीचे ३५ ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र, ८० हजार रुपये किंमतीची ८ ग्रॅम सोन्याची चेन, ६० हजारांची साडेपाच ग्रॅम सोन्याची ब्रेसलेट तसेच २ लाख ५० हजार रुपये किंमतीचा २५ ग्रॅम वजनाचा हार असा एकूण ६ लाख ४० हजारांचा ऐवज आहे.
या प्रकरणात साहिम ऐनरकर याला अटक करण्यात आली असून भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत कलम 331(4) आणि 305(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास दापोली पोलिसांकडून सुरू आहे.









