सहा लाखाचा ऐवज लंपास; अज्ञातावर गुन्हा दाखल
दापोली:- शहरातील शिवाजीनगर येथील संगीता तलाठी यांच्या घरी साखरपुड्याची तयारी सुरू असतानाच सुमारे ६ लाख रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या पाटल्या चोरट्याने लंपास केल्याची घटना ७ डिसेंबर रोजी दुपारी ३ पासून रात्री ११.३० वाजण्याच्या कालावधीत घडली. या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी संगीता संदेश तलाठी (रा. ऐश्वर्या बंगला, शिवाजीनगर, दापोली) यांच्या घरी साखरपुडा होता. त्यासाठी मेहंदी काढण्याचा कार्यक्रम दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास सुरू होता. मेहंदी काढत असताना तलाठी यांनी दोन्ही हातातील सोन्याच्या पाटल्या ड्रेसिंग रुमच्या टेबलामधील ड्रॉवरमध्ये काढून ठेवल्या होत्या. तलाठी आजारी असल्याने त्यांनी औषधे घेतल्यामुळे त्यांना त्या दरम्यान झोप लागली होती, तलाठी यांच्या हातावरील मेहंदी काढून झाल्यानंतर अन्य घरातील नातेवाईक महिलांच्या हातावर मेहंदी काढण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, झोपेतून उठल्यानंतर तलाठी यांना आठवण झाल्यानंतर बांगड्या पाहिल्या असता त्या बांगड्या जागेवर आढळून आल्या नाहीत. त्या कोणीतरी चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याबाबत दापोली पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी अधिक तपास दापोली पोलीस करीत आहेत.









