विसापूर पाचरीकोंड येथील घटना
दापोली:- उदरनिर्वाहासाठी कामाच्या शोधात दापोलीत आलेल्या यवतमाळ येथील एका ३५ वर्षीय तरुणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. धनराज तुळशीराम टेकाम (रा. वणी जुनी गावठण, जि. यवतमाळ) असे मृत तरुणाचे नाव आहे. दापोली तालुक्यातील विसापूर पाचरीकोंड येथे तो बेशुद्ध अवस्थेत सापडल्यानंतर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील खबर देणार राजू तुकाराम रामगडे आणि त्यांचा मित्र धनराज टेकाम हे दोघे कामाच्या शोधात दापोली तालुक्यातील विसापूर येथे आले होते. रविवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास विसापूर पाचरीकोंड येथील आस्वाद हॉटेलच्या जवळील रस्त्याच्या कडेला धनराज हा झोपलेला असल्याचे राजू रामगडे यांच्या निदर्शनास आले. त्यांनी धनराजला उठवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याच्या शरीराची कोणतीही हालचाल होत नव्हती. त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्याला उठवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले, परंतु धनराजकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने तातडीने रुग्णवाहिका बोलावून त्याला उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे हलवण्यात आले.
दुपारी १:३५ वाजण्याच्या सुमारास रुग्णालयातील डॉक्टरांनी धनराजची वैद्यकीय तपासणी केली असता उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. वैद्यकीय अहवालानुसार, ‘तीव्र मायोकार्डियल इन्फ्राक्शन’मुळे म्हणजेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्यामुळे हृदय आणि श्वसनसंस्था बंद पडल्याने धनराजचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या घटनेची नोंद दापोली पोलीस ठाण्यात ४ जानेवारी रोजी दुपारी ४:२६ वाजता बी.एन.एस.एस. कलम १९४ आणि अकस्मात मृत्यू क्रमांक ०२/२०२६ नुसार करण्यात आली आहे.









