दापोलीत पार्किंगमध्ये भीषण आग; दोन दुचाकी जळून खाक

दापोली:- दापोली शहरातील फॅमिली माळ परिसरात शुक्रवारी सकाळी भीषण आग लागल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही घटना नूर मंजिल गल्लीतील आयशा प्लाझा कॉम्प्लेक्स येथे घडली असून, या आगीत दोन दुचाकी पूर्णपणे जळून खाक झाल्या तर आणखी पाच दुचाकींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सकाळी साडेसहाच्या सुमारास इमारतीच्या पार्किंगमध्ये अचानक धूर निघू लागल्याचे स्थानिकांना लक्षात आले. काही क्षणांतच आग भडकली आणि वाहनांनी पेट घेतला. प्राथमिक तपासात गाड्यांपैकी एका वाहनात शॉर्टसर्किट झाल्यामुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरिकांनी तत्परतेने पाणी टाकून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या वेळीच केलेल्या प्रयत्नांमुळे आग आणखी पसरण्यापासून रोखली गेली. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेनंतर रहिवाशांनी त्वरित पोलिसांना आणि स्थानिक प्रशासनाला माहिती दिली. कॉम्प्लेक्समध्ये बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्यात आली असून त्यात कोणतीही संशयास्पद हालचाल आढळून आलेली नाही, अशी माहिती रहिवाशांनी दिली. तथापि, आगीचे नेमके कारण अजून स्पष्ट झालेले नाही. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी सुरक्षाव्यवस्थेची पुनर्रचना करण्याची मागणी रहिवाशांकडून होत आहे.