दापोलीत पारा 11.09 अंशापर्यंत घसरला

जिल्ह्यात थंडीची दुलई; 90 टक्के कलमांना पालवी

रत्नागिरी:- मतलई वार्‍यांमुळे कोकणावर थंडीची दुलई पसरु लागली आहे. गावागावात गारवा जाणवू लागला आहे. दापोलीत पारा 11.09 अंश सेल्सिअस तर रत्नागिरीत 17 अंशापर्यंत घसरलेला आहे. संपुर्ण महाराष्ट्रात थंडी पडू लागली तरीही रत्नागिरी जिल्ह्याला प्रतिक्षा होती; मात्र गेल्या चार दिवसात पारा घसरु लागला होता. सुरवातीलाच दापोलीत पारा खाली आल्याने थंडीचा कडाका दिवाळीत वाढण्याची शक्यता आहे. लांबलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील 90 टक्के आंबा कलमांना पालवी फुटली जुन असलेली 7 टक्के कलमे मोहोरलेली आहेत.

मोसमी पाऊस यंदा ऑक्टोबर अखेरपर्यंत होता. त्यामुळे थंडीही लांबली. आठ दिवसांपुर्वी रत्नागिरी जिल्ह्यात मतलई वारे वाहू लागले. त्यानंतर हवेत गारवा जाणवू लागला; मात्र कडाक्याची थंडीची रत्नागिरीकरांना प्रतिक्षाच होती. मंगळवारी (ता. 10) रात्री हलकी थंडी पडली होती. बुधवारी सकाळी दापोली तालुक्यातील किमान तापमान 11.09 अंश सेल्सिअस नोंदले गेले. हंगामाच्या पहिल्याच टप्प्यात पारा खाली घसरल्यामुळे यंदा चांगली थंडी पडेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हवामान तज्ज्ञांनीही यंदा कडाक्याची थंडी पडेल असा अंदाज वर्तविलेला होता. त्या अनुषंगाने वातावरणात बदल सुरु झाले आहेत. दापोली तालुका हा मिनी महाबळेश्‍वर म्हणून ओळखला होता. यंदा विक्रमी घट होईल अशी शक्यता आहे. कमाल तपमान 32 अंश सेल्सिअस आहे. सकाळी 11 ते दुपारी 3 या कालावधीतच हवेत उष्मा असतो. त्यानंतर दिवसाही गारवा जाणवू लागतो. संगमेश्‍वर, चिपळूण, दापोली, खेड, मंडणगडसह अन्य तालुक्यातील नदी किनारी भागात थंडीची तिव्रता अधिक जाावत आहे. रत्नागिरीत पारा 17 अंशापर्यंत खाली आला असून कमाल तापमान 33 अंशापर्यंत आहे.

लांबलेल्या पावसामुळे यंदा आंबा कलमे उशीराने येण्याची शक्यता आहे. पावसामुळे 90 टक्के पालवी आली असून 5 ते 7 टक्केच कलमे जुन आहेत. झाडांची संख्या मुबलक आहे, तिथे फुट नाही. पालवी आली तर आता लगेच फुटणार नाही. पालवी नसलेल्या झाडांना दिड महिना वाट पहावी लागेल. आताच्या परिस्थितीवरुन आंबा हंगामाचे चित्र स्पष्ट होणार नाही; मात्र जानेवारी महिन्यात मोहोर आला तर मार्चच्या पहिल्या आठवड्यात आंबा बाजारात जाईल. कल्टारचा वापर केला गेला तर चित्र वेगळे असेल.