दापोलीत देहविक्री करणाऱ्या महिलेसह लॉज मालकाला अटक

दापोली:- शहरातील एका लॉजमध्ये देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याच्या मिळालेल्या माहितीनुसार, रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने एक महिला आणि लॉज मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. भर शहरात उघडकीस आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. ही घटना गुरूवारी सायंकाळी ४ च्या सुमारास उघडकीस आली.

दापोली शहरातील भर बाजारपेठेत उघडकीस आलेल्या या देहविक्रीच्या व्यवसायामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, शहरात एक महिला देहविक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती रत्नागिरी येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला प्राप्त झाली होती. त्यानुसार दापोली पोलिसांच्या मदतीने त्यांनी गुरूवारी डमी ग्राहक पाठवून या महिलेला शहरातील एका लॉजवरून लॉज मालकासह ताब्यात घेतले. दरम्यान, या महिलेला चौकशीसाठी दापोली पोलीस स्थानकात आणण्यात आले असून या बाबत गुन्हा नोंदवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.