दापोलीत दुचाकी अपघातात दोघे जखमी; आरोपी दुचाकीस्वार फरार

दापोली:- दापोली-हर्णे मुख्य रस्त्यावर १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजताच्या सुमारास झालेल्या एका भीषण मोटार अपघातात एका स्थानिक पत्रकारासह त्यांची मुलगी जखमी झाली आहे. खोताची वाडी रिसॉर्टसमोर झालेल्या या अपघातात एका अज्ञात दुचाकीस्वाराने मागून ॲक्टिव्हा गाडीला जोरदार धडक दिली आणि मदतीऐवजी तो घटनास्थळावरून फरार झाला.

याप्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पत्रकार राजेश राजाराम लिंगायत (वय ४४, रा. मल्लखामपेठ, गुरववाडी, हर्णे) हे दिनांक १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८.४५ वाजता आपली मुलगी वृंदा (वय ५) हिला शाळेत सोडण्यासाठी त्यांच्या मालकीच्या (एम.एच.०८ ए.यु. ९०२३) या क्रमांकाच्या ॲक्टिव्हा दुचाकीवरून हर्णेकडून दापोलीकडे जात होते. ते सालदुद्रे येथील खोताची वाडी रिसॉर्ट समोरील मुख्य रस्त्यावर आले असता, त्यांच्या मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका अज्ञात दुचाकी वाहनावरील चालकाने आपले वाहन निष्काळजीपणे आणि बेदरकारपणे चालवत फिर्यादीच्या अॅक्टिव्हा गाडीला मागून जोरात धडक दिली.

हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये फिर्यादी राजेश लिंगायत यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले, तर त्यांची मुलगी वृंदा हिलाही दुखापत झाली आहे. तसेच, अपघातामुळे अॅक्टिव्हा गाडीचेही मोठे नुकसान झाले आहे. धक्कादायक बाब म्हणजे, अपघात घडवून आणल्यानंतर आरोपी दुचाकीस्वार मदतीसाठी न थांबता तातडीने घटनास्थळावरून पळून गेला.

या घटनेमुळे परिसरात काहीकाळ वाहतुकीचा खोळंबा झाला होता. जखमी अवस्थेत राजेश लिंगायत यांनी घटनेची माहिती दापोली पोलिसांना दिली. दापोली पोलीस ठाण्यात या अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

गुन्हा नोंद क्रमांक २२०/२०२५ असून, अज्ञात आरोपी दुचाकीस्वाराविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१ (बेदरकार वाहन चालवणे), १२५ (अ) (दुखापत करणे), १२५ (ब) (गंभीर दुखापत करणे) तसेच मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ (बेदरकार ड्रायव्हिंग), १३४(अ) आणि १३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.