दापोलीत झोलाई देवी मंदिरात चोरी

चोरट्यांनी १४ घंटा केल्या लंपास

दापोली:- दापोली तालुक्यातील ८४ गावांचे श्रद्धास्थान आणि अत्यंत पुरातन म्हणून प्रसिद्ध असलेल्या गावतळे येथील श्री झोलाई देवी मंदिरात सोमवारी (१२ जानेवारी) रात्री चोरट्यांनी डल्ला मारला. चोरट्यांनी मंदिरातील लहान-मोठ्या एकूण १४ पितळी घंटा चोरून नेल्या असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
पूजा करण्यासाठी गेल्यावर प्रकार उघड
मंगळवारी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास मंदिराचे पुजारी बाळकृष्ण गुरव हे नित्यनियमानुसार पूजेसाठी आले असता, त्यांना मंदिरातील घंटा गायब असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने ग्रामस्थांना याची माहिती दिली. वार्ता वाऱ्यासारखी पसरताच मंदिर परिसरात भाविक आणि ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती.
चोरट्यांनी अत्यंत सराईतपणे चोरी केल्याचे दिसून येत आहे. मंदिराच्या पायऱ्यांवरील पहिली घंटा आणि गाभाऱ्याबाहेरील सुमारे १५ किलो वजनाची मोठी घंटा चोरट्यांनी खुर्चीचा आधार घेऊन काढली. तर गाभाऱ्यातील पूजेसाठी वापरली जाणारी घंटा आणि एकत्रित टांगलेल्या ७ घंटाही चोरट्यांनी लंपास केल्या. याशिवाय झोलाई देवी मंदिरासोबतच शेजारील श्री मानाई देवी मंदिरातील समोरील आणि आतील ३ घंटाही चोरट्यांनी चोरल्या आहेत.
घटनेची माहिती मिळताच खेडचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार यादव आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी झोलाई देवी मंदिर, मानाई देवी मंदिर आणि लगतच्या स्मशानभूमी परिसराची पाहणी केली.

​८४ गावांचे मूळस्थान
​गावतळे येथील झोलाई देवी मंदिर हे अत्यंत जागृत देवस्थान मानले जाते. कोकणातील झोलाई देवीच्या महिमा असलेल्या सर्व ८४ गावांचे हे मूळस्थान असून, मुंबई-पुण्यासह राज्यभरातून येथे भक्त दर्शनासाठी आणि नवस फेडण्यासाठी येत असतात. अशा प्रसिद्ध मंदिरात चोरी झाल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

​”आम्ही सर्व शक्यता पडताळून पाहत आहोत. शेजारील गावात सोमवारी आठवडा बाजार होता, त्यादृष्टीनेही तपास सुरू आहे. मंदिर प्रसिद्ध असल्याने ग्रामस्थांनी येथे तातडीने सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत आणि गावात येणाऱ्या अनोळखी फेरीवाल्यांवर लक्ष ठेवावे,” असे आवाहन पोलीस उपनिरीक्षक यादव यांनी केले.